बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते म्हणाले “मित्रपक्षांशी बोलणी झाल्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करणार”
नवी दिल्ली: गेले अनेक दिवस सत्तास्थापनेचा जो पेच महाराष्ट्रात निर्माण झाला आहे त्याची सांगता दिल्लीत झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीनंतर होण्याच्या मार्गावर आहे असे दिसते. आज पुनः एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी दोन्ही पक्षांच्या झालेल्या बैठकीत शिवसेनेसोबत युती करण्यावर एकमत झाल्याचे कळते.
यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “उद्या मुंबईत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची महत्वाची बैठक होईल.”
आज झालेल्या बैठकीनंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्रामध्ये पर्यायी सरकार बनवण्याच्या दृष्टीने दुसरी महत्त्वपूर्ण बैठक आज नवी दिल्लीत पार पडली. सर्व मुद्द्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा पूर्ण झाली असून एकमत झाले आहे. उद्या दोन्ही पक्षांचे नेते मुंबईला जाऊन महाआघाडीतील इतर मित्रपक्षांशी चर्चा करतील व आतापर्यंत झालेल्या घडामोडींची माहिती देतील. मित्रपक्षांशी बोलणी झाल्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करणार.”
