काँग्रेस-राष्ट्रवादीची नियोजित बैठक गेली उद्यावर; सेनेच्या गोटात धाकधूक
मुंबई: राज्यात सरकार स्थापनेसाठीची काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये आज चर्चा होणार होती. पण आज होणारी बैठक रद्द झाली असून ती उद्यावर ढकलण्यात आली आहे.
महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेनेसोबत युती करावी की नको यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पण माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात काँग्रेस नेते व्यस्त असल्यामुळे ही बैठक उद्यावर ढकलण्यात आली आहे. पण जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतशी शिवसेनेची धाकधूक वाढत आहे. कालच दिल्ली येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी शिवसेने सोबत युती करण्याबाबत संदिग्ध वक्तव्य केले यामुळे मोठा सस्पेन्स निर्माण झाला आहे.
