‘क्या बोलती पब्लिक’ अभियानाची सप्टेंबरमध्ये घोषणा; पुढील सहा महिन्यांत देशभर संघटनात्मक विस्ताराचा आराखडा
छत्रपती संभाजीनगर, दि. ७ : सोशल मीडियावर अल्पावधीत चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) ने आपल्या संघटनात्मक विस्ताराच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्याकडे संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, आगामी काळात राज्य आणि लोकसभा मतदारसंघ पातळीवर संघटन उभारण्याचा निर्णयही पक्षाने जाहीर केला आहे.
सीजेपीची गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथे बैठक सुरू होती. या बैठकीत राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. तसेच ‘क्या बोलती पब्लिक’ या नावाने जनसंपर्क आणि लोकसंवादावर आधारित उपक्रम सप्टेंबर महिन्यात राबविण्यात येणार असल्याची माहितीही देण्यात आली.
कॉकरोच जनता पार्टीची स्थापना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान केलेल्या मौखिक निरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर झाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर पक्षाच्या इन्स्टाग्राम, फेसबुक आणि एक्सवरील अधिकृत समाजमाध्यम खात्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. पुढे अभिजीत दिपके भारतात परतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पक्षाने पाठिंबा दिला. त्या आंदोलनाच्या दबावानंतर सरकारने नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याचा दावा सीजेपीने यापूर्वी केला होता. त्यानंतर पक्षाने स्वतःला राजकीय पक्षाऐवजी दबाव गट म्हणून कार्यरत ठेवण्याची भूमिका जाहीर केली होती.
राष्ट्रीय कार्यकारिणी अशी
सीजेपीच्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीत संस्थापक आणि राष्ट्रीय संयोजक म्हणून अभिजीत दिपके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्याकडे सहसंयोजकपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राष्ट्रीय संघटना प्रभारी म्हणून अजिंक्य शिंदे, संघटना सहप्रभारी म्हणून दीपक बलियान, राष्ट्रीय सचिव म्हणून अफ्रीन नवाज, मीडिया प्रमुख म्हणून विजय रेड्ड मलंगी, कायदेविषयक घडामोडी प्रमुख म्हणून रत्ना सिंग, रिसर्च अँड पॉलिसी लीड म्हणून वैष्णवी गौर, टेक्नोलॉजी लीड म्हणून रोहन देशपांडे आणि फायनान्स लीड म्हणून योगेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागीय जबाबदाऱ्यांमध्ये दीपक बलियान यांच्याकडे उत्तर विभाग, विजय रेड्डी मलंगी यांच्याकडे दक्षिण विभाग, अंकित भारद्वाज यांच्याकडे पूर्व व ईशान्य विभाग, तर योगेश इंगळे यांच्याकडे पश्चिम विभागाची धुरा सोपविण्यात आली आहे.
पक्षाने पुढील सहा महिन्यांत राज्य समन्वय समित्या तसेच लोकसभा आणि शहर पातळीवरील समन्वय समित्या स्थापन करण्याचा आराखडा तयार केला आहे. यासोबतच आज जाहीर करण्यात आलेल्या यादीव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीची पदाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली नसल्याचेही सीजेपीने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा आणि आगामी संघटनात्मक विस्ताराच्या आराखड्यामुळे सीजेपी पुढील काळात दबाव गट म्हणून विविध सार्वजनिक प्रश्नांवर अधिक सक्रिय भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
