विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर पोहोचले, थोड्याच वेळात भारतात आगमन
गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान थोड्याच वेळात वाघा बॉर्डर वर पोहोचले आहेत. वर्धमान यांना आज पाकिस्तानकडून सोडण्यात येणार आहे. भारत-पाकिस्तानची सीमा असलेल्या वाघा बॉर्डरवर आज सायंकाळी अभिनंदन यांना भारताच्या ताब्यात देण्यात येणार आहे. सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचं आगमन होणार असल्या कारणाने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही रद्द करण्यात आला.
भारतीय हवाई दलाने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राइक करत दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. भारताने केलेल्या कारवाईमुळे चिडलेल्या पाकिस्तानने बुधवारी भारतीय हद्दीत घुसखोरी केली. पण भारताने त्यांची विमानं परतवून लावली. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान पाडले असून त्यावेळी आपले मिग २१ विमान पाकिस्तानी हद्दीत कोसळून विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. यानंतर भारताने त्यांच्या सुटकेसाठी उच्च पातळीवर प्रयत्न सुरु केले होते. अखेर भारताला यश आलं आणि पाकिस्तानने अभिनंदन यांची सुटका कऱण्याचा निर्णय घेतला.
