राहुल गांधी म्हणाले, “जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे हे कोरोना विरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र आहे.”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्या त्या राज्याचे मुख्यमंत्री जनतेशी संवाद साधत आहेत. आज दुपारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही एक ऑनलाईन प्रेस कॉन्फरन्स घेतली. यावेळी ते म्हणाले की, “हे स्पष्टच आहे की परिस्थिती गंभीर आहे. जर आपल्याला ही समस्या सोडवायची असेल आणि या विषाणुला हरवायचे असेल, तर सर्व राजकीय पक्ष आणि भारतातील सर्व लोकांनी एकत्र येऊन काम करावे लागेल”
आपल्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये त्यांनी कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या घेण्याबाबत सूचना केल्या. ते म्हणाले की, “हॉटस्पॉट नसलेल्या भागातही कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात घेतल्या पाहिजेत. चाचण्या केल्या नाहीत तर रुग्ण समोर येणार नाही आणि त्यासाठी टेस्टिंग किट उपलब्ध करून दिली पाहिजेत. सध्या टेस्टिंग किटची कमतरता आहे त्यासाठी काही पर्याय शोधला पाहिजे.” तसेच ते पुढे म्हणाले की, “जास्तीत जास्त कोरोना चाचण्या करणे हे कोरोना विरुद्धचे सर्वात मोठे शस्त्र आहे. विषाणु कसा आणि किती प्रमाणात पसरलाय याची माहिती आपल्याला अधिकाधिक चाचण्या करूनच मिळू शकते.”
