“लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?” : मनसे अध्यक्ष राज ठाकरे
नवी मुंबई: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १४ वा वर्धापन दिन. आजच्याच दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ह्यांनी मनसेची स्थापना केली. तत्पूर्वी त्यांनी शिवसेनेतील आपल्या सर्व पदांचा आपल्या समर्थकांसह राजीनामा दिला होता. यावेळचा मेळावा महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्ष राज ठाकरे यांनी शॅडो कॅबिनेटची घोषणा केली.
राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :
🔸 महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारी जी खाती आहेत त्यावर करडी नजर ठेवण्यासाठी हे प्रतिरूप मंत्रिमंडळ आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत कि, सरकारचे वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करा.
🔸 १४ वर्ष झाली, पक्षाचा प्रवास सुरु आहे, ह्यात माध्यमांनी प्रेम दिलं, बोचरी टीका केली पण हे चालायचंच. इतक्या चढ उतारानंर देखील तुम्ही सगळे महाराष्ट्र सैनिक माझ्यासोबत राहिलात ह्याचा मला आनंद झाला आहे.
🔸 काँग्रेस केंद्रात सत्तेत होती आज दिल्लीत एकही आमदार निवडून नाही आला. ही स्थित्यंतरं होत असतात. जेव्हा देशात लाट असते तेंव्हा अनेक पक्षांना पराभव स्वीकारावा लागतो. तरीही मलाच विचारतात की तुमचा पराभव का झाला?
🔸 गेल्या १४ वर्षात आपण अनेक कामं केली, तरीही मतदानाच्या वेळेस लोकं कुठे जातात हे कळत नाही, लोकांना कामाच्या अपेक्षा आमच्याकडून आहेत, पण मतदान आम्हाला नाही करणार ह्याला काय अर्थ आहे?
🔸 प्रतिरूप मंत्रिमंडळाच्या बाबतीत पक्षाचे पदाधिकारी नसलात पण तुम्हाला एखाद्या विषयात काम करायची इच्छा असेल तर त्यांनी माझ्याशी थेट संपर्क साधावा. मी तुम्हाला ह्या कामात सहभागी करून घेईन.
