माझी कधी मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्याची आशा आकांशा राहिली नाही. मी माझ्या पक्षासाठी काम करतोय : संजय राऊत
“शिवसेना आमदारांना फोडण्याचा प्रयत्न केला जातोय या साऱ्या अफवा आहेत पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून संपर्क केला जात असल्याची बातमी आपल्या कानावर आली आहे” असे म्हणत आज सकाळी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पत्रकारांच्या प्रश्नांनां उत्तरं दिली. काल भाजपच्या सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून शिवसेनेला उद्देशून चर्चेला बसण्याबाबत वक्तव्य करण्यात आलं होतं. यावर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते याबाबत उत्सुकता होती.
यावेळी संजय राऊत यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्हाला जर मुख्यमंत्री बनवलं तर तुम्ही सर्वात पहिला निर्णय काय घ्याल? यावर क्षणाचाही विलंब न लावता ते म्हणाले की, “मुख्यमंत्री हा शिवसेनेचा होईल. माझी कधी मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्याची आशा आकांशा राहिली नाही. मी माझ्या पक्षासाठी काम करतोय, मी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करतोय.”
पुढे ते म्हणाले की जर भाजप १४५ चा जादुई आकडा गाठू शकत असेल तर त्यांनी खुशाल सत्तास्थापनेचा दावा करावा.
