मुद्रांक शुल्क परताव्यासाठी अर्ज करण्याची मुदत सहा महिन्यांऐवजी एक वर्ष; महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
मुंबई, दि. २६ : दानपत्र नोंदणी, मुद्रांक शुल्कासंदर्भातील अपील आणि शुल्क परताव्याच्या प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जवळच्या नातेवाईकांना निवासी किंवा कृषी मालमत्ता दान करताना आकारले जाणारे मुद्रांक शुल्क २०० रुपयांवरून ५०० रुपये करण्यात येणार आहे. तसेच अपील दाखल करण्यासाठीचे शुल्क ३०० रुपयांऐवजी एक हजार रुपये आकारले जाईल. मुद्रांक शुल्क परताव्यासाठी अर्ज करण्याची मुदतही सहा महिन्यांवरून एक वर्ष करण्याचा प्रस्ताव आहे.
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील तरतुदींमध्ये सुधारणा करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध प्रकारच्या नोंदणी प्रक्रियांमध्ये मुद्रांक शुल्काबाबत एकसमानता आणि सुसंगती आणण्याच्या उद्देशाने हा बदल प्रस्तावित करण्यात आला आहे.
जवळच्या नातेवाइकांना मालमत्ता दान करणे महागणार
महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील अनुच्छेद ३४ नुसार, निवासी किंवा कृषी मालमत्ता पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात किंवा मयत मुलाची पत्नी यांना दान केल्यास सध्या २०० रुपये मुद्रांक शुल्क आकारले जाते. नव्या प्रस्तावानुसार हे शुल्क ५०० रुपये करण्यात येणार आहे.
त्यामुळे संबंधित नातेसंबंधांमध्ये मालमत्तेचे दानपत्र तयार करणाऱ्यांना यापुढे वाढीव मुद्रांक शुल्क भरावे लागेल.
अपील शुल्क ३०० रुपयांवरून एक हजार रुपये
मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब) आणि कलम ५३ (१अ) अंतर्गत अपील दाखल करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्कातही वाढ प्रस्तावित आहे. सध्या या दोन्ही प्रकारच्या अपिलांसाठी ३०० रुपये शुल्क भरावे लागते. सुधारित तरतुदीनुसार हे शुल्क एक हजार रुपये होईल.
मुद्रांक शुल्क परताव्यासाठी वर्षभराची मुदत
मुद्रांक खरेदी केल्यानंतर त्याचा परतावा मिळवण्यासाठी अर्ज करण्याच्या कालमर्यादेतही बदल केला जाणार आहे. सध्या कलम ५२ अंतर्गत परताव्यासाठी मुद्रांक खरेदीच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. ही मुदत वाढवून एक वर्ष करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
परताव्यासाठी अर्ज करणाऱ्या मुद्रांकधारकांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ मिळावा, हा या बदलामागील उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या सुधारणांसाठी महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमातील कलम ३२ (ब), कलम ५३ (१अ) आणि कलम ५२ मध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्यासंदर्भातील विधेयक विधिमंडळात मांडण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. विधेयकाला विधिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर या तरतुदींच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा होईल.

