२५ आंतरराष्ट्रीय संघांच्या सहभागाच्या पार्श्वभूमीवर नियोजन; ३७० किलोमीटरचा मार्ग निश्चित, २२ अपघातप्रवण ठिकाणांवरील सुधारणा ६० दिवसांत पूर्ण करण्याची सूचना
पुणे, दि. २४ : पुणे ग्रँड टूर २०२७ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे आयोजन यंदा अधिक मोठ्या स्तरावर होणार असल्याने प्रशासनासमोर तयारीचे आव्हान वाढले आहे. स्पर्धेसाठी २५ संघ सहभागी होणार असून, सुमारे ३७० किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे, वाहतुकीचे नियोजन, स्पर्धकांची सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधांची उभारणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले आहेत.
पुणे ग्रँड टूरच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पुण्यातील शासकीय विश्रामगृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध शासकीय विभागांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. स्पर्धेच्या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांवरील त्रुटी दूर करण्यासाठीही संबंधित यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
२२ अपघातप्रवण ठिकाणांवर ६० दिवसांत उपाययोजना
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बैठकीत वाहतूक आणि रस्ते सुरक्षेच्या नियोजनाची माहिती दिली. स्पर्धेसाठी २६ व ३१ जानेवारी या सुट्टीच्या दिवशी सुमारे ३७० किलोमीटरचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे वाहतुकीवरील संभाव्य परिणाम कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यातील २२ अपघातप्रवण ठिकाणांवर रस्ते सुरक्षा उपाय, दिशादर्शक फलक, दिवे, सीसीटीव्ही यंत्रणा आणि वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठीची कामे ६० दिवसांत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली. स्पर्धेच्या कालावधीत वाहतुकीत होणारे बदल, बंद ठेवण्यात येणारे मार्ग आणि पर्यायी रस्ते यांची माहिती नागरिकांना आधीच व्यापक स्वरूपात द्यावी, यावरही भर देण्यात आला.
रस्त्यांच्या कामांचा दर्जा राखण्याचे निर्देश
पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रात स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, एकाच ठिकाणी वेगवेगळ्या यंत्रणांकडून कामे सुरू असतील, तर त्यांच्यात समन्वय राखून दर्जाबाबत तडजोड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींनी रस्त्यांच्या कामांबाबत मांडलेल्या सूचना संबंधित विभागांनी गांभीर्याने घ्याव्यात. वैद्यकीय मदत, आपत्कालीन सेवा आणि सुरक्षेच्या दृष्टीनेही आवश्यक व्यवस्था आधीपासून तयार ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
२०३२ च्या जागतिक स्पर्धेच्या दृष्टीनेही महत्त्व
पुणे ग्रँड टूरची सुरुवात स्वर्गीय अजित पवार यांच्या पुढाकारातून गेल्या वर्षी पुणे जिल्ह्यात झाली. लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे या स्पर्धेला अल्पावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले. याच स्पर्धेच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर २०३२ मध्ये जागतिक सायकल फेडरेशनची चॅम्पियनशिप पुण्यात आयोजित करण्यास मान्यता मिळाली आहे.
२०२७ मधील स्पर्धेची व्याप्ती मागील वर्षाच्या तुलनेत वाढली आहे. जगभरातील सुमारे ९० संघांकडून अर्ज प्राप्त झाले असून, त्यातून २५ संघांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली. त्यामुळे यंदाचे आयोजन अधिक सक्षमपणे करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

लोकप्रतिनिधींच्या सूचनांवर चर्चा
बैठकीला आमदार सुनील शेळके, आमदार चेतन तुपे, आमदार शंकर मांडेकर, आमदार बाबाजी काळे आणि आमदार हेमंत रासने उपस्थित होते. त्यांनी रस्त्यांची कामे, वाहतूक व्यवस्था आणि अन्य सुविधांबाबत विविध मुद्दे मांडले. या सूचनांवर चर्चा करून संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले.
उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि विविध शासकीय विभागांचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
स्पर्धेच्या आयोजनाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याबरोबरच पुणेकरांना कमीत कमी गैरसोय होईल, यासाठी वाहतूक आणि नागरी सुविधांचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार रस्ते सुरक्षा आणि पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्यावर आता प्रशासनाचा भर राहणार आहे.
