सोन्याची पावडर दूध, ओट्स आणि पिठात मिसळून आणली; दुबईहून आलेल्या तीन प्रवाशांना अटक
मुंबई, दि. २६ : खाद्यपदार्थांच्या पाकिटांत सोन्याची पावडर लपवून भारतात तस्करी करण्याचा प्रयत्न महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पथकाने उधळून लावला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या तीन भारतीय प्रवाशांकडून ९.४० किलो विदेशी सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची किंमत १४.८१ कोटी रुपये असून, तिन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली आहे.
२३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे डीआरआयच्या मुंबई विभागीय पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे विमानतळावर या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत विमानतळावरील हवाई गुप्तचर विभाग आणि सीमाशुल्क विभागानेही सहकार्य केले.
प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना सोन्याची तस्करी करण्याची वेगळीच पद्धत समोर आली. तस्करांनी विदेशी सोन्याचे अतिशय बारीक पावडरमध्ये रूपांतर करून ते खाद्यपदार्थांमध्ये मिसळले होते. सोन्याची पावडर आणि खाद्यपदार्थांचा रंग व पोत सारखा असल्याने तपासणीदरम्यान ती सहज लक्षात येऊ नये, अशी व्यवस्था करण्यात आली होती.
खाद्यपदार्थांच्या पाकिटांत सोन्याची पावडर
दूध पावडर, ओट्स, विविध प्रकारची पिठे, न्युट्रिला आणि नारळाच्या दुधाची पावडर अशा दैनंदिन वापरातील खाद्यपदार्थांच्या पाकिटांत सोन्याची भुकटी आढळली. या तिन्ही प्रवाशांच्या सामानातून सोन्याची पावडर मिसळलेले सुमारे ३३.५० किलो खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.
या खाद्यपदार्थांमधून सोन्याची पावडर वेगळी करण्यासाठी काळजीपूर्वक तपासणी आणि विलगीकरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. त्यानंतर त्यातून ९.४० किलो विदेशी सोने मिळाले. त्याचे बाजारमूल्य सुमारे १४.८१ कोटी रुपये असल्याचे डीआरआयने स्पष्ट केले.
संघटित तस्करी टोळीशी संबंध
चौकशीदरम्यान तिन्ही प्रवाशांनी आपण एकाच संघटित सोने तस्करी टोळीसाठी काम करत असल्याची कबुली दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सीमाशुल्क कायदा, १९६२ मधील संबंधित तरतुदींनुसार सोने जप्त करून तिघांनाही अटक करण्यात आली.
खाद्यपदार्थांच्या स्वरूपात सोन्याची पावडर लपवण्याची ही पद्धत तपास यंत्रणांसमोर नवे आव्हान उभे करणारी आहे. नेहमीच्या तपासणीत संशय येऊ नये, यासाठी सोन्याचे खाद्यपदार्थांमध्ये मिश्रण करण्यात आले होते. मात्र, गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईमुळे तस्करीचा हा प्रयत्न उघडकीस आला.

