सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ आणि आरोग्य यंत्रणेच्या मदतीने प्रशिक्षण; जिवंत साप आणून प्रात्यक्षिक करण्यास बंदी
मुंबई, दि. ११ : डोंगराळ आणि वनक्षेत्राच्या आसपास असलेल्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सर्पदंशाच्या धोक्यापासून सावध करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा, एकलव्य मॉडेल निवासी शाळा आणि वसतिगृहांमध्ये १९ ते २६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्पदंश प्रतिबंध व जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जाणार आहेत.
या अभियानाचा केंद्रबिंदू केवळ सापांपासून बचाव करण्यापुरता मर्यादित राहणार नसून, सर्पदंश झाल्यानंतर घ्यावयाची तातडीची काळजी, वैद्यकीय उपचारासाठी विलंब न करण्याचे महत्त्व आणि सर्पदंशाशी संबंधित गैरसमज दूर करण्यावरही भर दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांसह शाळा व वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनाही याबाबत मार्गदर्शन मिळणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारीतील अनेक शाळा आणि वसतिगृहे दुर्गम, डोंगराळ तसेच जंगलालगतच्या परिसरात आहेत. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांचा साप, विंचू किंवा अन्य वन्यजीवांशी अनपेक्षित संपर्क होण्याची शक्यता असते. त्यामुळे संभाव्य घटना टाळण्यासाठी सुरक्षित वर्तनाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे हे अभियानाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
अभियानादरम्यान प्रत्येक शाळा आणि वसतिगृहात किमान एक तासाचे जनजागृती सत्र घेण्याचे नियोजन आहे. स्थानिक सर्पमित्र, सर्पतज्ज्ञ तसेच आरोग्य आणि वन विभागाच्या सहकार्याने ही सत्रे आयोजित केली जातील. साप दिसल्यास त्याच्यापासून सुरक्षित अंतर ठेवणे, घाबरून त्याला पकडण्याचा किंवा ठार करण्याचा प्रयत्न न करणे, अशा प्रसंगी सुरक्षित ठिकाणी जाणे यासारख्या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येतील.
सर्पदंश झाल्यास संबंधित व्यक्तीची अनावश्यक हालचाल टाळणे आणि शक्य तितक्या लवकर आरोग्य संस्थेत नेणे यावरही विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. सर्पदंशावर उपचार करण्याऐवजी पारंपरिक पद्धती, अंधश्रद्धा किंवा अप्रमाणित उपायांचा आधार घेण्याचे धोके विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजावून सांगितले जाणार आहेत.
आरोग्य यंत्रणेच्या तयारीवरही भर
सर्पदंशाच्या घटनांची वेळेवर नोंद आणि त्याबाबतचा अहवाल देण्याच्या दृष्टीनेही विभागाने यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने १८ ऑगस्ट २०२६ रोजी सर्पदंशाचा अधिसूचित आजार म्हणून समावेश केला आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटनांचे निरीक्षण, त्यांची नोंद तसेच अँटी-स्नेक व्हेनम (एएसव्ही) उपलब्ध असलेल्या केंद्रांची माहिती अद्ययावत ठेवण्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
दरम्यान, जनजागृतीच्या नावाखाली विद्यार्थ्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी शाळा किंवा वसतिगृहाच्या आवारात जिवंत साप आणून प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करण्यास स्पष्ट मनाई करण्यात आली आहे. सर्पविषयक प्रशिक्षण सुरक्षित पद्धतीनेच घेण्याचे निर्देश संबंधित संस्थांना देण्यात आले आहेत.
मुख्याध्यापक, अधीक्षक आणि परिचारिका यांनी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने संपर्क साधता यावा यासाठी आवश्यक माहिती नियमितपणे तपासून ठेवावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. जवळचे आरोग्य केंद्र, तेथील संपर्क क्रमांक, एएसव्ही उपलब्ध असलेल्या आरोग्य संस्थांची माहिती, आपत्कालीन वाहतुकीची व्यवस्था आणि स्थानिक सर्पमित्रांचे दूरध्वनी क्रमांक यांची नोंद दर तीन महिन्यांनी अद्ययावत करावी लागणार आहे.
अभियानाच्या काळात विभागाच्या डिजिटल स्टुडिओच्या माध्यमातूनही तज्ज्ञांची मार्गदर्शनपर सत्रे आयोजित केली जाणार आहेत. त्यामुळे दुर्गम भागातील शाळांपर्यंत सर्पदंश प्रतिबंध आणि आपत्कालीन प्रतिसादाबाबतची माहिती डिजिटल माध्यमातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
अभियानाची अंमलबजावणी केल्यानंतर संबंधित शाळा आणि वसतिगृहांनी केलेल्या जनजागृती कार्यक्रमाचा अहवालही वरिष्ठ स्तरावर सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे सर्पदंशाच्या घटना घडण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि घटना घडल्यानंतर तातडीचा वैद्यकीय प्रतिसाद, या दोन्ही पातळ्यांवर यंत्रणा कार्यरत ठेवण्याचा विभागाचा प्रयत्न आहे.

नाशिक आदिवासी विकास विभागाचे आयुक्त (प्र.) गोपीचंद कदम यांनी अभियानाचे महत्त्व स्पष्ट करताना सांगितले, “आदिवासी विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षितता ही विभागाची सर्वोच्च प्राथमिकता आहे. सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियानाच्या माध्यमातून दुर्गम भागातील आश्रमशाळांमधील विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये सर्पदंशाबाबत योग्य जनजागृती निर्माण होऊन आपत्कालीन परिस्थितीत प्राण वाचविण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठीही हे अभियान महत्त्वपूर्ण ठरेल,”
सर्पदंशाचा धोका असलेल्या परिसरातील विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य कृती करता यावी, यासाठी ही जनजागृती महत्त्वाची मानली जात आहे. विशेषतः वैद्यकीय उपचार मिळण्यास होणारा विलंब टाळणे आणि सर्पदंशाबाबतचे चुकीचे समज दूर करणे यामुळे आपत्कालीन परिस्थितीत अधिक परिणामकारक प्रतिसाद देण्यास मदत होऊ शकते.
