“मराठी चित्रपटांसाठी अधिकाधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्यात येणार” – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १० : मराठी चित्रपटांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अधिक व्यासपीठ मिळावे, यासाठी राज्य सरकारकडून चित्रपटगृहांची उपलब्धता वाढविण्याची तयारी सुरू आहे. त्याचबरोबर चित्रपट निर्मितीतील आधुनिक तंत्रज्ञान, विविध प्रकारचे चित्रीकरण संच आणि आवश्यक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणारी अत्याधुनिक चित्रनगरी विकसित करण्याची योजनाही सरकारने आखली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
६२ व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी अधिक चित्रपटगृहे उपलब्ध करून देण्याचा आराखडा लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत चित्रपटसृष्टीच्या विकासाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.
मराठी चित्रपटांच्या आशयाला जागतिक स्तरावरची क्षमता
मराठी चित्रपटांची ओळख केवळ प्रादेशिक मनोरंजनापुरती मर्यादित नसून आशय, वैविध्य आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर त्यांनी देशातील सर्वोत्तम चित्रपटांमध्ये स्थान निर्माण केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मराठी रंगभूमीची दीर्घ परंपरा आणि तिची कलात्मक प्रतिष्ठा याचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला.
या समृद्ध सांस्कृतिक पायाभूत वारशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला सातत्याने नवे प्रयोग करण्याची आणि पुढे जाण्याची संधी मिळत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
सोहळ्याला सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, फिल्मसिटीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांच्यासह ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर, अभिनेत्री हेलन खान, अभिनेत्री राणी मुखर्जी, अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक, किरण शांताराम आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
ज्येष्ठ कलावंतांचा पुरस्काराने गौरव
या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओक यांना चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला.
सलीम खान यांना राज कपूर जीवनगौरव पुरस्कार, तर अभिनेत्री राणी मुखर्जी यांना राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सलीम खान यांच्या वतीने अभिनेत्री हेलन यांनी त्यांचा पुरस्कार स्वीकारला.
पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या प्रदीर्घ संगीत कारकिर्दीचाही मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला. ‘मोगरा फुलला’, ‘अरे अरे ज्ञाना झालासी पावन’, ‘रुणूझुणू रुणूझुणू रे भ्रमरा’ आणि ‘शिवकल्याण राजा’ यांसारख्या रचनांमधून मराठी संस्कृती, अध्यात्म आणि राष्ट्रभावना प्रभावीपणे व्यक्त झाल्याचे त्यांनी नमूद केले.
सलीम खान यांच्या लेखनाचा भारतीय चित्रपटांवर प्रभाव
सलीम-जावेद जोडीसह सलीम खान यांनी भारतीय चित्रपटांच्या कथनशैलीवर महत्त्वाचा प्रभाव टाकल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. ‘जंजीर’, ‘दीवार’ आणि ‘शोले’ यांसारख्या चित्रपटांमधील प्रभावी नायक आणि लक्षात राहणाऱ्या व्यक्तिरेखांमुळे हिंदी चित्रपटसृष्टीला नवे वळण मिळाले.

‘अँग्री यंग मॅन’ ही व्यक्तिरेखा लोकप्रिय होण्यामागे त्यांच्या लेखनाचा मोठा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रसाद ओक यांच्या अभिनय आणि दिग्दर्शनातील योगदानाचे कौतुक करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना कलेच्या विविध क्षेत्रांत प्रभावी काम करणारे ‘३६० डिग्री मॅन’ असे संबोधले. ‘धर्मवीर’मधील आनंद दिघे यांची भूमिका त्यांनी प्रभावीपणे साकारल्याचे सांगत फडणवीस यांनी त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
राणी मुखर्जी यांच्या तीन दशकांच्या चित्रपट कारकिर्दीचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला. विविध प्रकारच्या भूमिका साकारताना त्यांनी स्त्रीकेंद्री कथांना प्रभावीपणे मांडले असून ‘मर्दानी’सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
मराठी चित्रपटसृष्टीसमोरील निर्मिती आणि प्रदर्शनाच्या संधी वाढविण्याबरोबरच आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे आगामी काळात या क्षेत्राला नवे बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
