अर्ज लॉक करणे अनिवार्य; ८ ऑगस्टला प्रवेश वाटप यादी जाहीर होणार
मुंबई, दि. ४ : राज्यातील इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित करू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ४ ऑगस्टपासून विशेष प्रवेश फेरी सुरू होत असून, या फेरीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चित कालावधीत पसंतीक्रम भरून अर्ज अंतिम स्वरूपात लॉक करावा लागणार आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी सुमारे १२.९८ लाख विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. मात्र काही विद्यार्थ्यांकडून प्रवेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने त्यांच्यासाठी ही विशेष फेरी आयोजित करण्यात आली आहे.
या विशेष फेरीत विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने किमान १० कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवणे बंधनकारक राहील. पसंतीक्रम भरल्यानंतर अर्ज अंतिम स्वरूपात लॉक केल्याशिवाय तो ग्राह्य धरला जाणार नाही. प्रवेश वाटप विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादी आणि पसंतीक्रमाच्या आधारे करण्यात येणार आहे.
विशेष फेरीसाठी नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी तसेच अर्जाच्या पहिल्या भागातील आवश्यक दुरुस्तीसाठी ४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याच कालावधीत विद्यार्थ्यांना पसंतीक्रम निश्चित करून अर्ज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध असेल.
प्रवेश वाटपाची प्रक्रिया ७ ऑगस्ट रोजी पार पडेल, तर ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता प्रवेश वाटपाची यादी अधिकृत प्रवेश पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल. वाटप झालेल्या विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती अल्प संदेशाद्वारेही पाठविण्यात येणार आहे.
प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजल्यापासून १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता उपलब्ध रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे.
दरम्यान, इतर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेश प्रक्रियेतील अर्ज मागे घ्यावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. तसेच विद्यार्थी, पालक आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक काळजीपूर्वक पाळावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रवेश प्रक्रियेविषयी अधिक माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून, आवश्यक मार्गदर्शनासाठी हेल्पलाईन क्रमांक ८५३०९५५५६४ वर संपर्क साधण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

