निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसला कागदपत्रांची मागणी; पक्षघटनेतील बदलांबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र
मुंबई, दि. ३ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक घडामोडींवर केंद्रीय निवडणूक आयोगाने लक्ष केंद्रित केले असून, पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांसह पक्षघटनेतील बदलांची अधिकृत कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना आयोगाने यासंदर्भात पत्र पाठवून आवश्यक माहिती लवकरात लवकर सादर करण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय निवडणूक आयोगाने २७ जुलै रोजी पाठविलेल्या पत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २६ फेब्रुवारी रोजी झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आणि अधिवेशनात मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची तसेच पक्षघटनेत करण्यात आलेल्या बदलांची अधिकृत कागदपत्रे आयोगाकडे अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे नमूद केले आहे.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आणि अधिवेशन पार पडले होते. या अधिवेशनात सर्वानुमते सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती आणि त्याची अधिकृत घोषणा करण्यात आली होती.
या अधिवेशनादरम्यान पक्षघटनेतील कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मध्ये बदल करण्याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतला होता. मात्र, त्या बदलांशी संबंधित प्रस्ताव आणि आवश्यक कागदपत्रे निवडणूक आयोगाकडे सादर झालेली नसल्याचे आयोगाने पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे संबंधित सर्व कागदपत्रे आणि प्रस्ताव तातडीने आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
याचबरोबर आयोगाने पक्षाच्या विद्यमान राष्ट्रीय कार्यकारिणीच्या वैधतेबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. सध्याची राष्ट्रीय कार्यकारिणी वैध आहे का, याबाबत स्पष्टीकरण देण्याची अपेक्षा आयोगाने पत्राद्वारे व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाच्या या पत्रानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आवश्यक कागदपत्रे आणि स्पष्टीकरण सादर केले जाणार का, तसेच आयोग यावर पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
