परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; सणासाठी १२,५०० रुपये उचल, महागाई भत्त्यातही वाढ
मुंबई, दि. ५ : आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) कर्मचाऱ्यांच्या दिवाळीसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर केले आहेत. राज्यातील सुमारे ८३ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार असून, पात्र कर्मचाऱ्यांना १२ हजार ५०० रुपयांची सण उचलही दिली जाणार आहे. महागाई भत्त्यात दोन टक्क्यांची वाढ करून तो ६० टक्क्यांवर नेण्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.
एसटीतील विविध कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत हे निर्णय जाहीर करण्यात आले. महामंडळाची आर्थिक स्थिती आव्हानात्मक असली, तरी कर्मचाऱ्यांना सणाच्या काळात मदत देण्याची भूमिका मंत्री सरनाईक यांनी मांडली.
निर्णयामुळे महामंडळावर १६० कोटींचा भार
सानुग्रह अनुदान, सण उचल आणि महागाई भत्त्यातील वाढ यामुळे एसटी महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे. कर्मचाऱ्यांच्या योगदानाचा विचार करून हा खर्च स्वीकारण्यात येत असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
“एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी अहोरात्र मेहनत करून लाखो प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची सेवा देतात. त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून दिवाळीच्या सणानिमित्त त्यांना सानुग्रह अनुदान देणे हे केवळ औदार्य नसून त्यांचा हक्क आहे. या निर्णयामुळे महामंडळावर सुमारे १६० कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार असला, तरी कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, हे आमचे कर्तव्य आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
आंदोलन टाळण्याचे आवाहन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या पाठिंब्यामुळे महामंडळाच्या भवितव्याबाबत आशावाद असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी नमूद केले. कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारू नये, असे आवाहन त्यांनी केले.
“एसटी ही सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे. कोणत्याही आंदोलनामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये. कर्मचारी आणि प्रवासी हे एसटीचे दोन महत्वाचे घटक आहेत. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर संवादातून मार्ग काढण्यास आम्ही सदैव तयार आहोत,” असेही त्यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्यांबाबत घेतलेल्या या निर्णयांमुळे दिवाळीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे. त्याचवेळी प्रवासी सेवा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी आणि महामंडळ यांच्यात संवाद कायम राहण्यावर परिवहन विभागाने भर दिला आहे.

