रिक्त वैद्यकीय पदे ऑगस्टमध्ये भरणार; साताऱ्यातील आरोग्य प्रकल्पांचा मंत्रालयात सविस्तर आढावा
मुंबई/सातारा, दि. २९ : सातारा जिल्ह्यातील शासकीय आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी राज्य शासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत. जिल्हा रुग्णालयातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या एमआरआय आणि कॅथलॅब सुविधा तातडीने कार्यान्वित करण्यासह रिक्त वैद्यकीय पदे भरून नागरिकांना अत्याधुनिक उपचार सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सातारा जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील रुग्णालये आणि आरोग्य संस्थांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव ई. रविंद्रन, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक संजय काटकर, सहसंचालक (रुग्णालय) डॉ. सुनिता गोल्हाईत, पुणे परिमंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार, उपसचिव दीपक केंद्रे, सातारा जिल्हा शल्य चिकित्सक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय आणि कॅथलॅब सेवा तातडीने सुरू करण्यावर विशेष भर देण्यात आला. या सुविधा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील रुग्णांना अनेक अत्याधुनिक निदान व उपचार सेवांसाठी अन्य शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
ऑगस्टमध्ये सुमारे १,४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
राज्यातील शासकीय आरोग्य व्यवस्थेला आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी सुमारे १,४४० वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदांवर ऑगस्ट महिन्यात नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती मंत्री प्रकाश आबिटकर यांनी बैठकीत दिली. या भरतीमुळे शासकीय रुग्णालयांमधील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि परिणामकारक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जनआरोग्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक नागरिकांना तिचा लाभ मिळावा, यासाठी नियोजनबद्ध कार्यवाही करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. तसेच आरोग्य सेवा आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांची पाहणी करावी आणि वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा, असे निर्देशही मंत्री आबिटकर यांनी दिले.
विकासकामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन
बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सातारा जिल्हा रुग्णालयातील एमआरआय, कॅथलॅब तसेच आयुष रुग्णालयाच्या कामांना गती देण्यावर भर दिला. नागरिकांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
आरोग्य सेवेला सर्वोच्च प्राधान्य
राज्यातील सार्वजनिक आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावणे आणि प्रलंबित आरोग्यविषयक प्रकल्पांना गती देणे हे शासनाच्या प्राधान्यक्रमात असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले. सातारा जिल्ह्यातील आरोग्यविषयक सर्व प्रलंबित विकासकामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रभावी समन्वय राखून काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
सातारा जिल्ह्यातील आरोग्य पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी झालेल्या या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी आता कितपत वेगाने होते, याकडे जिल्ह्यातील नागरिकांसह आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
