नवे दर मध्यरात्रीपासून लागू
मुंबई, दि. १७ : राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात १३.५६ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, सुधारित भाडेदर आज मध्यरात्रीपासून राज्यभर लागू होणार आहेत. डिझेलचे वाढलेले दर, वाहनांच्या सुट्या भागांचा वाढता खर्च, टायर, देखभाल, दुरुस्ती तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये झालेली वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
महामंडळाने स्पष्ट केले आहे की, वाढत्या आर्थिक भारामुळे एसटीच्या नियमित व अखंड सेवांवर ताण निर्माण होत होता. त्यामुळे आर्थिक शाश्वतता राखणे, प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा सातत्याने उपलब्ध करून देणे तसेच महामंडळाची आर्थिक स्थिती अधिक सक्षम करणे या उद्देशाने राज्य परिवहन प्राधिकरणाने भाडेवाढीस मान्यता दिली आहे.
दरवाढीबाबत निर्णय घेताना यापूर्वी साध्या बससेवेवर लागू करण्यात आलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली असून, त्याऐवजी सर्व बससेवांसाठी सुधारित भाडे रचना लागू करण्यात येणार आहे.
महामंडळाच्या माहितीनुसार, अलीकडील काळात आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधनाच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर डिझेलचे दर, वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीचा खर्च, टायर व सुटे भाग यांची किंमत वाढली असून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. या सर्व घटकांचा एकत्रित परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर झाला असून त्यानुसार भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील लाखो प्रवाशांना दररोज सेवा देणाऱ्या एसटी महामंडळावर वाढत्या खर्चाचा मोठा आर्थिक ताण पडत असल्याचेही महामंडळाने नमूद केले आहे. भविष्यातील सेवा अधिक सक्षम, टिकाऊ आणि प्रवासीहिताची ठेवण्यासाठी आर्थिक समतोल राखणे आवश्यक असल्याने हा निर्णय अपरिहार्य ठरल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.
याबाबत परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले, “भाडेवाढ निश्चित करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार प्रवासी सेवा सातत्याने उपलब्ध करून देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा,” असे आवाहनही त्यांनी केले.

