देशातील ७५ अमृत भारत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण
बारामती, दि. १७ : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील पुनर्विकसित ७५ अमृत भारत रेल्वे स्थानकांचे तसेच महाराष्ट्रातील बारामती आणि नांदुरा या दोन आधुनिक रेल्वे स्थानकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. बारामती रेल्वे स्थानक येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना, बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा केवळ स्थानकाचा कायापालट नसून बारामतीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक, कृषी आणि शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला पुणे रेल्वे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव, उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारतीय रेल्वेचा आधुनिकतेकडे वेगाने प्रवास सुरू असून जागतिक दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षित आणि प्रवासीस्नेही सेवा यामुळे भारतीय रेल्वे नव्या भारताच्या विकासाचे प्रतीक बनली आहे. अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारतसारखे उपक्रम हे त्या परिवर्तनाचे उत्तम उदाहरण असल्याचे” त्यांनी सांगितले.
बारामती रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, विकासदृष्टी आणि सर्जनशीलता वाढावी या उद्देशाने “विकसित रेल्वे स्थानकाचा भारत” आणि “विकसित भारत घडवण्यासाठी मी काय करेन” या विषयांवर निबंध आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एम.ई.एस. गजाननराव भीमराव देशपांडे विद्यालय, निर्मला हरिभाऊ प्राथमिक शाळा तसेच इतर शाळांमधील एकूण २ हजार ८५ विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी स्वच्छ, आधुनिक, पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सर्वसमावेशक रेल्वे स्थानकाची संकल्पना मांडत विकसित भारतासाठी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच विजेत्यांचे उपमुख्यमंत्री यांनी अभिनंदन केले.
देशभरात आतापर्यंत २६१ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास पूर्ण झाला असून आज आणखी ७५ स्थानके राष्ट्राला समर्पित होत असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.

त्या पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांना गेल्या काही वर्षांत मोठी गती मिळाली असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग आहे. उद्योग, शिक्षण, कृषी आणि सहकार क्षेत्रातील बारामतीची ओळख अधिक बळकट करण्यासाठी हे आधुनिक स्थानक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या सुविधेमुळे औद्योगिक क्षेत्राला अधिक सक्षम वाहतूक व्यवस्था, कृषी उत्पादनांना विस्तृत बाजारपेठ आणि शिक्षणासाठी येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित व सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास सुमारे साडे २६ कोटी रुपये खर्चून करण्यात आला असून या प्रकल्पासाठी राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. स्थानकाच्या इमारतीची रचना आधुनिक सुविधांसह स्थानिक संस्कृतीचे प्रतिबिंब जपणारी करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, आधुनिक प्रतीक्षागृह, स्वच्छ प्रसाधनगृहे, सीसीटीव्ही आधारित सुरक्षा व्यवस्था, पर्यावरणपूरक सौरऊर्जा प्रणाली तसेच स्थानिक हस्तकला आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी विशेष दालनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेलाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीच्या सर्वांगीण विकासात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे योगदान कायम स्मरणात राहील, असे नमूद करत विकासाचा हा वारसा पुढे नेण्याचे आवाहनही त्यांनी केले. केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयातून विकासकामांना गती मिळत असून बारामती रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास हे त्याचेच प्रभावी उदाहरण असल्याचे त्या म्हणाल्या.
रेल्वे मंत्रालय, रेल्वे विकास निगम लिमिटेड, रेल्वे प्रशासन तसेच या प्रकल्पात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांनी बारामतीकरांना आधुनिक रेल्वे स्थानकाची स्वच्छता, सौंदर्य आणि सुविधा जपण्याचे आवाहन केले. या पुनर्विकासामुळे बारामतीच्या विकासाला अधिक वेग मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पुणे विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा यांनी प्रास्ताविकात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुणे विभागातील रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचा आढावा घेत बारामती रेल्वे स्थानकाचा इतिहास विशद केला. पुनर्विकसित स्थानकामुळे परिसरातील नागरिकांना अधिक दर्जेदार आणि आधुनिक रेल्वे सेवा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात पुणे विभागीय रेल्वे मंडळातर्फे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त, शिक्षण आणि तंत्रज्ञान या विषयांवरील स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील दोन अमृत भारत रेल्वे स्थानकांचे लोकार्पण झाल्यानंतर बारामती येथील पुनर्विकसित रेल्वे स्थानकाच्या कोनशिलेचे प्रत्यक्ष अनावरण उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी स्थानकाची पाहणी केली तसेच स्थानकावर उभ्या असलेल्या रेल्वेत जाऊन प्रवासी आणि विक्रेत्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी, सूचना आणि अनुभव जाणून घेतले.

