३१ ऑगस्टपर्यंत कलम १६३ लागू, पर्यटकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
मुंबई, दि. ९ : पावसाळ्यात वाढणारी पर्यटकांची गर्दी, अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या धोकादायक परिस्थिती, संभाव्य अपघात आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील प्रमुख पर्यटनस्थळांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम १६३ लागू करण्यात आले आहे. हा प्रतिबंधात्मक आदेश ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रभावी राहणार असून, पर्यटकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने जारी केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या निर्देशानुसार आणि स्थानिक प्रशासनाच्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. पावसाळ्यात धबधबे, किल्ले आणि जलाशय परिसरात मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असल्याने अनेकदा अपघात, वाहतूक कोंडी तसेच बचावकार्याची आवश्यकता निर्माण होते. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संबंधित पर्यटनस्थळांवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार मौजे लोणावळा परिसरातील भाजे धबधबा, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, एकविरा देवी कार्ला लेणी तसेच पवना धरण परिसर या प्रमुख पर्यटनस्थळांवर कलम १६३ अंतर्गत बंदी आदेश लागू राहतील.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, धोकादायक ठिकाणी जाणे, पाण्यात उतरून जीव धोक्यात घालणे, वाहतूक कोंडी निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे किंवा अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या कृती टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर उतार, धबधबे, दऱ्या आणि जलाशय परिसरात अचानक परिस्थिती बदलण्याची शक्यता असल्याने पर्यटकांनी विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे.
पर्यटकांनी धोकादायक कडे, धबधबे, पाणीसाठे आणि इतर जोखमीच्या भागांपासून सुरक्षित अंतर राखावे. तसेच प्रशासन, पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांनाच महत्त्व द्यावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासनाने इशारा दिला आहे की, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात येईल. त्यामुळे पर्यटकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेचा विचार करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा कायम असून, विशेषतः डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या भागात भूस्खलन, वेगवान पाण्याचा प्रवाह आणि दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सतर्कता वाढवली आहे. अशा परिस्थितीत अनावश्यक पर्यटन टाळणे आणि अधिकृत परवानगी असलेल्या ठिकाणीच भेट देणे, हेच सुरक्षिततेच्या दृष्टीने हितावह असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

