एडनच्या आखातात भारतीय नौदलाची मोठी कामगिरी; ‘आयएनएस त्रिकंद’ने ‘एमव्ही गोल्डन आर्सेनल’वरील चाच्यांचा हल्ला उधळला
एडन, दि. ३ : एडनच्या आखातात व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या भारतीय नौदलाने पुन्हा एकदा तत्परता आणि व्यावसायिक कौशल्याचे दर्शन घडवले आहे. भारतीय नौदलाच्या ‘आयएनएस त्रिकंद’ या युद्धनौकेने ‘एमव्ही गोल्डन आर्सेनल’ या मालवाहू जहाजावरील समुद्री चाच्यांचा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. १ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेनंतर भारतीय नौदलाने तातडीने कारवाई करून जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली.
माहितीनुसार, सेंट व्हिन्सेंट अँड द ग्रेनेडीन्स देशाचा ध्वज असलेले ‘एमव्ही गोल्डन आर्सेनल’ हे मालवाहू जहाज येमेनमधील एडन येथून पुढील प्रवास करत असताना, जिबूतीपासून सुमारे ३०० सागरी मैल पूर्व-ईशान्य दिशेला समुद्री चाच्यांनी त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती इन्फर्मेशन फ्युजन सेंटर – इंडियन ओशन रिजन मार्फत मिळताच परिसरात कार्यरत असलेल्या ‘आयएनएस त्रिकंद’ला तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आले.
या मालवाहू जहाजावर एका भारतीय नागरिकासह एकूण २१ कर्मचारी कार्यरत होते. चाच्यांच्या हल्ल्यामुळे जहाजाच्या मुख्य नियंत्रण कक्षासह (ब्रिज सुपरस्ट्रक्चर) काही भागांचे नुकसान झाले. मात्र, जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांनी पूर्वनियोजित सुरक्षा प्रक्रियेचे पालन करत सुरक्षित कक्षात आश्रय घेतल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
२ जुलै २०२६ रोजी सकाळी ‘आयएनएस त्रिकंद’ च्या विशेष सुरक्षा पथकाने ‘एमव्ही गोल्डन आर्सेनल’ वर प्रवेश करून संपूर्ण जहाजाची सखोल तपासणी केली. या तपासणीत जहाजावर कोणताही संशयित किंवा चाच्यांचा सदस्य आढळून आला नाही. त्यानंतर जहाजावरील कर्मचारी सुरक्षित कक्षातून बाहेर आले आणि भारतीय नौदलाच्या जवानांसोबत जहाजाच्या नुकसानीची पाहणी सुरू केली.
या कारवाईदरम्यान भारतीय नौदलाच्या सागरी गस्ती विमानानेही महत्त्वाची भूमिका बजावली. या विमानाने संपूर्ण परिसरावर आकाशातून सतत नजर ठेवत संभाव्य धोक्यांवर लक्ष ठेवले आणि चाचेगिरीविरोधी मोहिमेला प्रभावी सहकार्य केले.
संपूर्ण परिसर सुरक्षित असल्याची खात्री झाल्यानंतर भारतीय नौदलाने ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. त्यानंतर ‘एमव्ही गोल्डन आर्सेनल’ ला पुढील प्रवासासाठी सुरक्षितपणे रवाना करण्यात आले.
हिंदी महासागर क्षेत्रात व्यापारी जहाजांची सुरक्षितता, समुद्री चाचेगिरीविरोधातील कारवाई आणि विविध देशांच्या खलाशांचे संरक्षण या दृष्टीने भारतीय नौदल सातत्याने सक्रिय भूमिका बजावत आहे. समुद्री मार्गांची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देण्यासाठी भारतीय नौदल सदैव सज्ज असल्याचे या यशस्वी मोहिमेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

