धाराशिवमधून उद्धव ठाकरे यांचा भाजप व फुटलेल्या खासदारांवर हल्लाबोल
धाराशिव, दि. २८ : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धाराशिव येथे आयोजित जाहीर सभेत भारतीय जनता पक्ष, पक्षफोड, फुटलेल्या खासदारांचा मुद्दा आणि संविधानातील तरतुदींचा संदर्भ देत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे प्रलंबित असलेल्या फुटलेल्या खासदारांच्या प्रकरणाकडेही लक्ष वेधले आणि त्यावर कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असल्याचे सांगितले.
सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फोडण्याच्या राजकारणावर निशाणा साधत भाजपवर स्वाभिमानी नेतृत्व संपविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “भाजपला महाराष्ट्रात एकही स्वाभिमानी शिल्लक ठेवायचा नाही, हा स्वाभिमान केव्हा संपेल, जेव्हा शिवसेना संपेल, ठाकरे संपेल तेव्हा त्यांना मुक्तद्वार मिळेल ते एवढं करुन देखील ठाकरे का संपत नाहीत यासाठी फोडाफोडी सुरु आहे. बाळासाहेब ठाकरे आमच्या ह्रदयात जोपर्यंत आहेत तोपर्यंत ठाकरे तुमच्या कितीही पिढ्या उतरल्या तरी महाराष्ट्रातून, देशातून आणि कोणाच्या मनातून संपवू शकत नाहीत. आम्ही तुमच्याबरोबर जोडले गेलो आहोत, म्हणून इतकी वर्ष होऊन, एवढी फोडाफोडी करुन सुद्धा शिवसेना का संपवावी लागते. ४० आमदार फोडले ९ खासदार आले. परत त्यातील ६ खासदार फोडले, मग समोर काय आहे, हे दिसतंय ते काय आहे. ही खरी शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना आमदार, खासदारांच्या संख्येमध्ये मोजता येत नाही. ती घराघरात आणि मनामनामध्ये, ह्रदयात घर करुन बसलेली आहे. नुसती मन की बात करुन नाही चालत, दिल की बात करावी लागते.”
यानंतर त्यांनी फुटलेल्या खासदारांच्या मान्यतेच्या प्रश्नावर लोकसभा अध्यक्षांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा उल्लेख करत संविधानातील पक्षांतरविरोधी तरतुदींचा संदर्भ दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “आतासुद्धा हे लटकणार आहेत. दोन दिवसांपूर्वी आपले दोन खासदार ओम बिर्लांना जाऊन भेटून आले आहेत. त्यांना घटनेचं एक पुस्तक दाखवलं आहे, त्याच्यातील एक नियम दाखवलं आहे. ते म्हणतात नऊ पैकी ६ झाले म्हणजे दोन तृतियांश झाले आहेत. माझ्या कानावर आलं त्यांचं कधीच ठरलं होतं, फक्त इथला जरा अडून बसला होता, कारण त्याला माहिती होतं, पाच झालेत, सहा झालेत तोपर्यंत दोन तृतियांश होत नाहीत, ताणून धरलं, भाव वाढवला मग गेला. कायद्यात जे लिहिलंय, घटनेत जे लिहिलंय, त्यानुसार दोन तृतियांश संख्येनं इकडून तिकडे गेले तरी पक्षात विलीन होण्याचा निर्णय पक्षानं घ्यावा लागतो आणि त्याला दोन तृतियांशनं पाठिंबा द्यावा लागतो.”
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून या प्रकरणात कोणता निर्णय घेतला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, असे सांगतानाच त्यांनी केंद्र सरकारच्या बहुमताबाबतही प्रश्न उपस्थित केला.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “आता पाहूया ओम बिर्ला काय करतात, लोकसभेवेळी आम्ही जे सांगत होतो त्यामुळं तुम्ही इथला खासदार निवडून दिलात. आता सुद्धा दोन तृतियांश बहुमत पाहिजे, कारण त्यांना घटना पायदळी तुडवायची होती. आता सुद्धा दोन तृतियांश बहुमत करुन घटनेत बदल करता येतात का हे त्यांना पाहायचं आहे, म्हणून त्यांना दोन तृतियांश बहुमत पाहिजे.”
उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेच्या संघटनात्मक बळावर विश्वास व्यक्त करत पक्षाची ताकद केवळ आमदार किंवा खासदारांच्या संख्येवर मोजता येत नसल्याचा दावा केला. तसेच पक्षफोडीच्या राजकारणावर टीका करत संविधान, पक्षांतरविरोधी कायदा आणि लोकसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही भाष्य केले.
दरम्यान, संविधानात दुरुस्ती करण्याची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेच्या कलम ३६८ अंतर्गत निश्चित करण्यात आली असून, विशिष्ट प्रकारच्या घटनादुरुस्त्यांसाठी संसदेत आवश्यक विशेष बहुमताची तरतूद आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात याच संदर्भाचा उल्लेख करत केंद्र सरकारवर राजकीय टीका केली.
