उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर हल्लाबोल
मुंबई, दि. १९ : शिवसेनेच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष संघटना, अलीकडील राजकीय घडामोडी, पक्षांतराचे आरोप-प्रत्यारोप आणि राज्यातील सत्तासमीकरणांवर सविस्तर भूमिका मांडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना, उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावरही जोरदार टीका केली.
राज्यातील अलीकडील राजकीय घडामोडी आणि खासदारांच्या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “रात्री खासदारांना शिव्या द्यायच्या आणि सकाळी कौतुक करायचं, हे असं चालतं का? सेनापतीने घरात बसून चालत नाही, त्याने पुढे येऊन लढावं लागतं. हा एकनाथ शिंदे लढवय्या आहे, कुणावर संकट आलं तर पुढे मी असेन. हे काय आम्हाला चॅलेंज देणार. आता म्हणतात तुडवा. हिंमत असेल तर समोर या. तुडवायला पाय लागतात, तुम्ही आला तर हे शिवसैनिक तुमचे पाय जागेवर ठेवतील का?”
याच संदर्भात त्यांनी आपल्या राजकीय निर्णयक्षमतेचा उल्लेख करताना म्हटले की, “हा एकनाथ शिंदे तुमच्यावर संकट आलं तर छातीचा कोट करून लढेल. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो, ऑपरेशन करायला वाघाचे काळीज लागते, लांडग्याचे नाही.”
उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका
वर्धापन दिनाच्या व्यासपीठावरून बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या वारशाचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, “रक्ताचे नाते सांगून, कोणी वारस होत नाही, सात बारावर नाव लावून कोणी वारस होत नाही, शिवसेना म्हणजे जमिनीचा तुकडा नाही, शिवसेना म्हणजे काळजाचा तुकडा आहे. बाळासाहेबांच्या हयातीत तुम्ही त्यांना त्रास देत होता. बाळासाहेब गेल्यानंतर त्यांना तिरस्कार असलेल्या लोकांचा पुरस्कार तुम्ही केला.”
शिवसेनेतील फुटीच्या इतिहासाचा उल्लेख करताना त्यांनी म्हटले, “शिवसेना पहिल्यांदा कोणी फोडली तर ती राष्ट्रवादीने. दुसऱ्यांदा कोणी फोडली तर ती काँग्रेसने. ते यांना पुढे करतात आणि ज्याने शिवसेनेचा भगवा यातून मुक्त केला त्याच्यावर टीका करतात.”
‘पक्ष म्हणजे शिवसैनिक’ – शिंदे
संघटनात्मक विस्तार आणि कार्यकर्त्यांच्या भूमिकेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले की, पक्षाचे खरे बळ हे सामान्य कार्यकर्ते आहेत. ते म्हणाले, “आमदार मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून संधी देणार नाही, त्याने जर कर्तृत्व केलं, काम केलं तर त्याकडे दुर्लक्षही करणार नाही. पक्ष म्हणजे आमदार-खासदार नाही, मंत्री नाही, तर पक्ष म्हणजे शिवसैनिक आहे. त्यांना जपलं पाहिजे. निवडणुकीनंतरही कार्यकर्ता हा आवडताच असला पाहिजे. कार्यकर्ता वाढला पाहिजे, तरच पक्ष वाढेल.”
तसेच त्यांनी पक्षातील संधींच्या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले, “माझ्याकडे वशिला लागत नाही, पैसे लागत नाही, मर्सिडीज लागत नाही, माझे लक्ष सगळ्यांकडे असते. त्यामुळेच आपण भीमाच्या पोरीला, ज्योती वाघमारेला राज्यसभा खासदार केलं. त्यामुळे सर्वसामान्य शिवसैनिकाला आपण संधी देतो.”
आनंद दिघे आणि कार्यकर्त्यांची आठवण
भावनिक होत आपल्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करताना एकनाथ शिंदे म्हणाले, “आनंद दिघे पाठीशी होते. त्यावेळी डोंगराएवढं दुःख होतं. आनंद दिघे आणि बाळासाहेब सोडून गेले. आज माझे नेते, कार्यकर्ते हेच माझे कुटुंब आहे.”
शिवसेनेच्या वाढीसाठी कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी संघटनेच्या मजबुतीसाठी सर्व स्तरांवरील कार्यकर्त्यांना अधिक संधी देण्याचा निर्धार व्यक्त केला.
फडणवीस-शिंदे संबंधांबाबतही भाष्य
राज्यातील सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतःमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे म्हणाले, “देवेंद्र फडणवीस आणि माझ्यामध्ये खोडा घालायचा प्रयत्न काही लोक करतात. पण आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलो नाही. कुछ लोग छुप छुप कर उन्हे बताते है, वो सब आकर हमें बताते है.”
राज्यातील सत्ताधारी महायुतीची एकजूट कायम असल्याचा दावा करत त्यांनी विरोधकांकडून पसरवल्या जाणाऱ्या अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन केले.
