राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार आधुनिक कौशल्यांचे प्रशिक्षण
मुंबई, दि. १९ : राज्यातील शिक्षण व्यवस्थेला तंत्रज्ञानाधारित आणि भविष्योन्मुख बनविण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी उद्देशपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून पुढील दीड वर्षांच्या कालावधीत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता आणि आधुनिक अध्यापन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत गुगल फॉर एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी उद्देशपत्रावर स्वाक्षरी केली. या करारामुळे राज्यातील शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.
यावेळी बोलताना मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर लक्षात घेता शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सक्षम करणे आवश्यक झाले आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण प्रक्रिया राबविण्यात येणार असून सुरुवातीला निवडक ‘मास्टर ट्रेनर्स’ तयार केले जातील. हे प्रशिक्षित शिक्षक पुढे राज्यभरातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देतील. या साखळी पद्धतीमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील प्रत्येक शाळेपर्यंत प्रशिक्षण पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रशिक्षण प्रक्रिया विनामूल्य असणार आहे. प्रशिक्षणासाठी राज्य शासनावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नसून सर्व सुविधा गुगल फॉर एज्युकेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शिक्षकांच्या माहितीची सुरक्षितता, डिजिटल गोपनीयता आणि प्रशिक्षण प्रक्रियेवरील नियंत्रण महाराष्ट्र शासनाकडेच राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, एकविसाव्या शतकातील शिक्षण व्यवस्थेत कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका सातत्याने वाढत आहे. विद्यार्थ्यांना आधुनिक जगातील स्पर्धेसाठी सक्षम बनवायचे असेल तर शिक्षकांना नव्या तंत्रज्ञानाची माहिती आणि वापराचे कौशल्य असणे आवश्यक आहे. या सहकार्यामुळे राज्यातील लाखो शिक्षकांना अत्याधुनिक प्रशिक्षणाची संधी मिळणार असून त्याचा थेट लाभ विद्यार्थ्यांनाही होईल.
या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत शिक्षकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता वाढविणे, डिजिटल कौशल्यांचा विकास करणे, आधुनिक अध्यापन पद्धतींचा वापर वाढविणे आणि तंत्रज्ञानाधारित शिक्षणाचा प्रसार करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. प्रशिक्षणासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये स्थानिकीकरण केलेली अभ्यास सामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख, आधुनिक शैक्षणिक साधनांचा वापर आणि अध्यापनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयुक्ततेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.
शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांचा वापर केल्याने अभ्यासक्रम नियोजन, मूल्यमापन, शैक्षणिक साहित्य निर्मिती आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण अधिक प्रभावीपणे करता येऊ शकते. त्यामुळे शिक्षकांच्या व्यावसायिक विकासालाही चालना मिळणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील डिजिटल शिक्षण सुविधांना अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. माहिती व दळणवळण तंत्रज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट वर्गखोल्या, जोडलेले वर्ग, डिजिटल ग्रंथालये आणि भाषा प्रयोगशाळा यांसारख्या सुविधांचा शैक्षणिक वापर अधिक परिणामकारक करण्यास या प्रशिक्षणाचा हातभार लागणार आहे.
कार्यक्रमास शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, सहसचिव ताशीलदार, गुगल फॉर एज्युकेशनचे वरिष्ठ अधिकारी संजय जैन तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदारीने आणि परिणामकारक वापर वाढविण्यासाठी राज्य शासन आणि गुगल यांच्यातील हे सहकार्य महत्त्वपूर्ण मानले जात असून, यामुळे महाराष्ट्रातील शिक्षकांना जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाधारित अध्यापन पद्धतींचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
