पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेचे दुसरे पर्व अधिक भव्य होणार; नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देश
पुणे, दि. १३ : आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण करू लागलेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पुढील पर्वासाठी नियोजनबद्ध तयारी करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने हालचाली वेगवान केल्या आहेत. यंदा झालेल्या पहिल्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनानंतर आता आगामी वर्षातील दुसरे पर्व अधिक व्यापक, अधिक दर्जेदार आणि अधिक प्रभावी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. यासाठी स्पर्धेच्या नियोजन, देखरेख आणि निर्णय प्रक्रियेसाठी स्वतंत्र नियामक परिषद स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी तसेच सायकलिंग क्षेत्राशी संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार म्हणाल्या की, पहिल्या ‘पुणे ग्रँड टूर’च्या यशस्वी आयोजनातून अल्प कालावधीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा उपक्रम उभा करण्याचे आव्हान महाराष्ट्राने यशस्वीपणे पेलले. आता आगामी स्पर्धेद्वारे या स्पर्धेची उंची, व्याप्ती आणि जागतिक ओळख अधिक मजबूत करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. केवळ गतवर्षीच्या यशाची पुनरावृत्ती न करता नवे मापदंड निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठबळामुळे ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित करण्यात आली. तसेच या स्पर्धेची मूळ संकल्पना आणि तिच्या माध्यमातून पुण्याला जागतिक क्रीडा नकाशावर स्थान मिळवून देण्याची दूरदृष्टी तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांनी मांडली होती. पुणे हे शिक्षण, उद्योग आणि संस्कृतीबरोबरच जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांचे केंद्र व्हावे, तसेच राज्यातील युवकांना सायकलिंगसारख्या खेळात मोठे व्यासपीठ मिळावे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गतवर्षी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला शहरापासून ग्रामीण भागापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला. स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणा, स्वयंसेवक, विविध शासकीय विभाग आणि सायकलिंग क्षेत्राशी संबंधित संस्थांनी मर्यादित कालावधीत प्रभावी समन्वय साधल्यामुळे स्पर्धेचे यशस्वी आयोजन शक्य झाले, असेही त्यांनी सांगितले.
आगामी स्पर्धेसाठी राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, नागरी संस्था आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहभागातून स्वतंत्र नियामक परिषद स्थापन करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. ही परिषद स्पर्धेच्या सर्व धोरणात्मक निर्णयांची आणि अंमलबजावणीच्या देखरेखीची सर्वोच्च संस्था म्हणून कार्य करेल. परिषदेकडून दरमहा बैठका घेऊन तयारीचा आढावा घेण्यात यावा, तसेच स्वतंत्र आयोजन समिती स्थापन करून प्रत्येक विभागाच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार स्पष्टपणे निश्चित करण्यात यावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
स्पर्धेच्या आयोजनासाठी आवश्यक निधीबाबत कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगताना त्यांनी सर्व महानगरपालिका, स्थानिक संस्था आणि संबंधित यंत्रणांनीही आर्थिक व प्रशासकीय सहभाग वाढवावा, असे मत व्यक्त केले.
बैठकीत विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी स्पर्धेला पर्यावरणपूरक स्वरूप देण्यावर भर दिला. स्पर्धा मार्गावरील गावांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रायोगिक योजना राबविणे, कचऱ्याचे घनीकरण करून त्याची वैज्ञानिक विल्हेवाट लावणे तसेच पर्यावरणपूरक बांबू उत्पादनांचा वापर वाढविणे यांसारख्या उपाययोजना राबविता येतील, असे त्यांनी सांगितले.
पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गतवर्षीच्या स्पर्धेदरम्यान वाहतूक व्यवस्थापन आणि सुरक्षेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आल्याचे नमूद केले. आगामी स्पर्धेत नागरिकांचा सहभाग अधिक वाढण्याची अपेक्षा व्यक्त करताना अंतिम टप्पा सार्वजनिक सुटीच्या दिवशी आयोजित केल्यास वाहतूक नियंत्रण अधिक सुलभ होईल, असे त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी सादरीकरणाद्वारे आगामी स्पर्धेची माहिती दिली. त्यांच्या मते, पहिल्या पर्वाच्या यशस्वी आयोजनामुळे पुणे जिल्ह्यातील गड-किल्ले, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळांना जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळाली. स्पर्धेच्या सुरक्षित आणि उच्च दर्जाच्या आयोजनाची दखल घेत जागतिक सायकलिंग संघटनेने स्पर्धेचा दर्जा उन्नत केला आहे.
यावर्षीच्या स्पर्धेत गतवर्षीच्या चार टप्प्यांच्या तुलनेत सहा टप्प्यांचा समावेश करण्यात येणार असून स्पर्धेचे एकूण अंतर १ हजार ९९ किलोमीटर असेल. त्यामुळे स्पर्धेची व्याप्ती, स्पर्धकांची संख्या आणि आंतरराष्ट्रीय सहभाग यामध्येही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
बैठकीच्या शेवटी गतवर्षीच्या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनात योगदान देणाऱ्या विविध अंमलबजावणी यंत्रणांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून पुणे आणि महाराष्ट्राची जागतिक क्रीडा क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

