मुंबई उपनगरात अतिक्रमणविरोधी मोहिमेला वेग; मानखुर्द परिसरातील १४ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त
मुंबई, दि. १२ : मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनींचे संरक्षण आणि सार्वजनिक मालमत्तेवरील अनधिकृत ताबे हटविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष अतिक्रमण निष्कासन मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रशासकीय विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या कारवाईत मानखुर्द आणि मंडाळे परिसरातील सुमारे १४ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करण्यात आली आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय जमिनींवरील वाढती अतिक्रमणे रोखण्यासाठी महसूल विभाग, पोलीस विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि इतर संबंधित यंत्रणांच्या संयुक्त सहभागातून ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी कुर्ला तालुक्यातील मानखुर्द परिसरातील सुमारे ११ एकर शासकीय जमीन अतिक्रमणमुक्त करून ती मुंबई मध्यवर्ती कारागृह प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर आता मोहिमेच्या पुढील टप्प्यात आणखी मोठी कारवाई करण्यात आली आहे.
काल दि. ११ जून २०२६ रोजी झालेल्या या विशेष कारवाईत मौजे मानखुर्द येथील नगर भूमापन क्रमांक १/१ तसेच मंडाळे परिसरातील नगर भूमापन क्रमांक ६/१ आणि खाडीलगतच्या शासकीय जागांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत व्यावसायिक बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या ठिकाणी व्यवसायासाठी वापरले जात असलेले सुमारे २२० अनधिकृत गोडाऊन, गाळे आणि इतर संरचना हटविण्यात आल्या.
या मोहिमेद्वारे एकूण १४ एकर शासकीय जमीन पुन्हा शासनाच्या ताब्यात आणण्यात यश मिळाले. प्रशासनाच्या मते, या जमिनींचा वापर भविष्यात विविध सार्वजनिक प्रकल्प, पायाभूत सुविधा आणि शासकीय गरजांसाठी करण्यात येऊ शकतो.
कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उपायुक्त समीर शेख यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण मोहिम शांततापूर्ण आणि सुरळीत पार पडली.
या विशेष मोहिमेत अपर जिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) पूर्व उपनगरे, उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण निष्कासन) चेंबूर, उपविभागीय अधिकारी (पूर्व उपनगरे), तहसीलदार कुर्ला, नगर भूमापन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कारवाई यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विविध विभागांतील मोठ्या मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये पोलीस विभागाचे सुमारे ६०० अधिकारी व कर्मचारी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे १५० कर्मचारी, महसूल विभागाचे १०० अधिकारी व कर्मचारी तसेच नगर भूमापन विभागाचे १० अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.
अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ३ पोकलेन यंत्रे आणि ४ जेसीबी यंत्रांचा वापर करण्यात आला. यंत्रसामग्रीच्या साहाय्याने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटवून जागा तातडीने मोकळी करण्यात आली.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, अतिक्रमणमुक्त करण्यात आलेल्या जागांचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ करण्यात येणार असून शासनाच्या धोरणानुसार संबंधित जमिनी विविध शासकीय प्रकल्प किंवा विभागांना उपलब्ध करून देण्यासाठी पुढील कार्यवाही केली जाईल.
महसूल विभागाच्या प्रभावी नियोजनामुळे आणि विविध यंत्रणांच्या समन्वयामुळे ही कारवाई यशस्वी ठरली असून, मुंबई उपनगर जिल्ह्यातील इतर शासकीय जमिनींवरील अतिक्रमणे हटविण्यासाठीही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा आगामी काळात अधिक तीव्रतेने राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शासकीय जमिनींवरील बेकायदेशीर ताबे रोखणे, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि विकासकामांसाठी आवश्यक जमीन उपलब्ध करून देणे या उद्देशाने महसूल विभागाची अतिक्रमणविरोधी मोहीम पुढील काळातही सुरू राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
