कबीर कांबळे आणि अक्षय बर्हे यांची उल्लेखनीय कामगिरी
मुंबई, दि. २० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘बार्टी’च्या प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत मार्गदर्शन घेतलेल्या विद्यार्थ्यांनी संघ लोकसेवा आयोगाच्या भारतीय वन सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ४ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात कबीर राहुल कांबळे यांनी १२५ वा, तर अक्षय विजय बर्हे यांनी १४० वा क्रमांक मिळवत राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांनी आपल्या यशामागे बार्टी संस्थेकडून मिळालेले सातत्यपूर्ण मार्गदर्शन, अभ्यास साहित्य, तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आणि आर्थिक सहाय्य यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले आहे. ग्रामीण आणि सामाजिकदृष्ट्या वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये सक्षम करण्यासाठी बार्टी संस्थेने राबविलेल्या योजनांचा हा महत्त्वपूर्ण परिणाम मानला जात आहे.
बार्टी संस्थेमार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांसाठी पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत टप्प्यांपर्यंत सर्वंकष प्रशिक्षण दिले जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना निवास, अभ्यास साहित्य, मार्गदर्शन कार्यशाळा आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. भारतीय वन सेवा परीक्षा २०२५ च्या मुख्य परीक्षेसाठी बार्टीमार्फत तब्बल ५२ विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात आले होते. त्यापैकी १० विद्यार्थ्यांनी मुलाखत आर्थिक सहाय्य योजनेचाही लाभ घेतला होता.
स्पर्धा परीक्षांमध्ये वाढती स्पर्धा लक्षात घेता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन मिळावे यासाठी बार्टीकडून अनुभवी अधिकारी, विषयतज्ज्ञ आणि माजी यशस्वी उमेदवारांच्या माध्यमातून विशेष प्रशिक्षण सत्रांचे आयोजन करण्यात येते. अभ्यासाचे नियोजन, उत्तरलेखन कौशल्य, मुलाखत तयारी आणि व्यक्तिमत्त्व विकास या घटकांवर विशेष भर दिला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात्मक परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जाण्यास मदत होत असल्याचे बार्टी प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
भारतीय वन सेवा ही देशातील प्रतिष्ठेची अखिल भारतीय सेवा मानली जाते. पर्यावरण संरक्षण, वन व्यवस्थापन, जैवविविधता संवर्धन आणि वन्यजीव संरक्षण यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये या सेवेतील अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे या परीक्षेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
बार्टीच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन करणाऱ्या कबीर कांबळे आणि अक्षय बर्हे यांचे संस्थेच्या महासंचालक दीपा मुधोळ-मुंडे, निबंधक डॉ. सुचिता शिंदे आणि विभागप्रमुख डॉ. बबन जोगदंड यांनी विशेष अभिनंदन केले आहे. दोन्ही विद्यार्थ्यांनी भविष्यात समाजातील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरित करण्याची भावना व्यक्त केली आहे.
राज्यातील वंचित आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बार्टी संस्था सातत्याने विविध प्रशिक्षण उपक्रम राबवत असून, आगामी काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केंद्रीय सेवांमध्ये स्थान मिळवावे, हा संस्थेचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.
