शिवसेनेतर्फे मंत्री विजय शिवतारे, राजन साळवी, भास्कर जाधव व राजेश क्षीरसागर यांसह अनेक इच्छुकांना मिळाले एबी फॉर्म
मुंबई: शिवसेना-भाजप ची युती होणार की नाही होणार, आणि होणार असेल तर त्याबाबतची घोषणा कधी होणार याकडे तमाम राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून आहे. पण या चर्चा एका बाजूला चालू असताना शिवसेनेने नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आज घटस्थापनेचा मुहूर्त साधत अनेक इच्छुक उमेदवारांना मातोश्री येथे ‘एबी’ फॉर्म चे वाटप केले आहे. ज्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत घरवापसी केलेले गुहागर मतदारसंघाचे भास्कर जाधव, मंत्री अर्जुन खोतकर, दोन दिवसांपूर्वी ज्या उमेदवाराबाबत माध्यमांमध्ये तथाकथित पक्षांतर्गत विरोध असल्याची चर्चा रंगली होती त्या राजापूरच्या आमदार राजन साळवी यांनाही शिवसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘एबी’ फॉर्म चे वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेने विद्यमान आमदारांसह दीपक केसरकर व विजय शिवतारे या मंत्र्यांनाही ‘एबी’ फॉर्म चे वाटप केले आहे.
महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली येथे अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत भाजपच्या नेत्यांचे बैठक सत्र चालू आहे. ज्यात युती बाबत घोषणा होण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वीच शिवसेनेने इच्छुकांना ‘एबी’ फॉर्म चे वाटप करावयास सुरुवात केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज ज्या जागांवरील इच्छुकांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत त्यातल्या रत्नागिरी व गुहागर या जागांवर भाजप आपला हक्क सांगण्याची दाट शक्यता आहे.

त्यातल्या त्यात रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर २००९ सालापर्यंत युतीत ही जागा भाजपकडे राहिली होती. पण २०१४ च्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली व येथे माजी मंत्री राष्ट्रवादीच्या उदय सामंत यांना शिवसेनेतर्फे उमेदवारी देण्यात आली. या जागी भाजपच्या माजी मंत्री बाळ माने यांच्याविरोधात विजय मिळवत उदय सामंत यांनी शिवसेनेच्या खात्यावर ही जागा वर्ग केली. रत्नागिरी सारखा पारंपरिक मतदारसंघ आपल्याला मिळावा यासाठी जर भाजपने दबाव टाकला व शिवसेनेने ताठर भूमिका घेतली तर युतीचं भविष्य धोक्यात राहील. तूर्तास आपला मित्रपक्ष भाजप च्या आधी एबी फॉर्म चे वाटप करून शिवसेना जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी दबाव तर टाकत नाही ना हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
१. राजेश क्षीरसागर –
२. संग्राम कुपेकर – चंदगड (कोल्हापूर)
३. संदीपान भुमरे – पैठण
४. संजय शिरसाट – औरगाबाद पश्चिम
५. अर्जुन खोतकर – जालना
६. सुजित मिणचेकर – हातकणंगले (कोल्हापूर)
७. संतोष बांगर – हिंगोली
८. अजय चौधरी – शिवडी (मुंबई)
९. गौतम चाबुकस्वार – पिंपरी
१०. उदय सामंत – रत्नागिरी
११. भास्कर जाधव – गुहागर
१२. योगेश कदम – दापोली
१३. राजन साळवी – राजापूर
१४. अनिलराव बाबर – खानापूर-आटपाडी (सांगली)
१५. अनिल कदम – निफाड
१६. योगेश घोलप – देवळाली
१७. राजाभाऊ वाजे – सिन्नर
१८. यामिनी जाधव – भायखळा
