बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांचा विक्रमी विजय; तब्बल २ लाख १८ हजार ९३० मताधिक्याने इतिहास रचला
बारामती, दि. ४ : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अभूतपूर्व आणि विक्रमी विजय संपादन करत देशातील सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी तब्बल २ लाख १८ हजार ९३० मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत बारामतीतील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. या ऐतिहासिक निकालानंतर बारामतीसह राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दिवंगत अजित पवार यांच्या पश्चात झालेली ही पहिली मोठी निवडणूक असल्याने भावनिक वातावरणही निर्माण झाले होते. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सुनेत्रा पवार यांनी आघाडी घेतली होती आणि प्रत्येक फेरीगणिक त्यांचे मताधिक्य वाढत गेले. अखेरीस त्यांनी विक्रमी मताधिक्याने विजयाची नोंद करत देशातील सर्वाधिक मतांनी विजयी होणाऱ्या आमदारांमध्ये अव्वल स्थान पटकावले.
या ऐतिहासिक विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी सामाजिक माध्यमांवरून बारामतीकरांचे आभार मानले. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, “बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मला भरघोस मतांनी विजयी केल्याबद्दल तमाम मायबाप बारामतीकरांचे मनःपूर्वक आभार. आपण दाखवलेला विश्वास, प्रेम आणि पाठिंबा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा आहे.”
त्या पुढे म्हणाल्या की, “आदरणीय अजितदादांच्या पश्चात झालेली बारामतीची ही पहिलीच निवडणूक होती. त्यांच्या मार्गदर्शनाची आणि उपस्थितीची उणीव आज प्रकर्षाने जाणवते. हा विजय माझ्यासाठी केवळ राजकीय यश नसून आदरणीय दादांच्या कार्याला आणि त्यांच्या स्मृतींना दिलेली खरी आदरांजली आहे.”
सुनेत्रा पवार यांनी आपल्या संदेशात अजित पवार यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत सांगितले की, “अजितदादांनी महाराष्ट्रासाठी आणि बारामतीसाठी केलेले कार्य, त्यांची जनतेशी असलेली नाळ आणि विकासाची दृष्टी आजही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. त्यांचे विचार आणि संस्कारच मला पुढे जाण्याची ताकद देत आहेत. हा विजय म्हणजे त्यांच्या स्वप्नांना आणि कार्याला पुढे नेण्याची जबाबदारी आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे.”
या विजयासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे आभार मानले. विविध सामाजिक संस्था, संघटना आणि बारामतीतील नागरिकांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
एक्स वर केलेल्या पोस्ट मध्ये त्या म्हणतात, “शिव-शाहू-फुले-आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेचा वारसा जपत, आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब आणि आदरणीय अजितदादांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा माझा निर्धार कायम राहील.तरुणाई, शेतकरी, महिला, उद्योजक आणि समाजातील सर्वच घटकांना केंद्रस्थानी ठेवून बारामतीच्या विकासासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे काम करूया. निवडणुका येतात आणि जातात, पण बारामतीचा सलोखा आणि जिव्हाळा कायम राहिला पाहिजे. म्हणूनच कोणताही जल्लोष न करता आपण कामातूनच हा विजय साजरा करूया. बारामतीकरांनी माझ्यावर ठेवलेला विश्वास मी कधीही कमी पडू देणार नाही. आपल्या सर्वांच्या सुख-दुःखात सदैव खंबीरपणे उभी राहीन, अशी मी आपणांस खात्री देते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, बारामतीच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”
विशेष म्हणजे या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उभ्या राहिलेल्या इतर उमेदवारांना अत्यल्प मते मिळाल्याचे चित्र दिसून आले. काही उमेदवारांना हजार मतांचाही टप्पा गाठता आला नाही. करूणा मुंडे यांना १२५ मते, तर अभिजित बिचुकले यांना १२१ मते मिळाल्याची नोंद निवडणूक निकालात झाली आहे.
बारामतीतील या निकालाकडे केवळ स्थानिक नव्हे तर राज्य आणि राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा विजय मोठा आत्मविश्वास वाढवणारा मानला जात असून आगामी राजकीय समीकरणांवरही या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
