द्रमुक व अण्णाद्रमुक ला मोठा धक्का
चेन्नई, दि. ४ : अभिनेते थलपथी विजय यांच्या ‘तामिळगा वेत्री कळघम’ पक्षाने तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत नोंदवलेले यश राज्याच्या राजकारणात मोठा टर्निंग पॉइंट मानले जात आहे. अनेक दशकांपासून द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन प्रमुख द्रविडी पक्षांच्या भोवती फिरणाऱ्या तामिळनाडूच्या राजकारणात विजय यांच्या पक्षाने जोरदार प्रवेश करत पारंपरिक राजकीय समीकरणांनाच मोठे आव्हान दिले आहे. राज्यातील मतदारांनी यावेळी पारंपरिक नेतृत्वापेक्षा नव्या चेहऱ्याला पसंती दिल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे.
राज्यातील निवडणूक निकालांमध्ये ‘तामिळगा वेत्री कळघम’ने अनेक मतदारसंघांत प्रभावी कामगिरी करत सत्तेच्या समीकरणात महत्त्वाची भूमिका निर्माण केली आहे. विशेष म्हणजे, फारशी राजकीय पार्श्वभूमी नसतानाही विजय यांनी पहिल्याच प्रयत्नात राज्यातील प्रस्थापित राजकीय पक्षांना कडवे आव्हान दिले आहे. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या पारंपरिक पक्षांबद्दल मतदारांमध्ये निर्माण झालेली नाराजी, भ्रष्टाचाराचे आरोप आणि नव्या नेतृत्वाची अपेक्षा या घटकांचा विजय यांच्या पक्षाला मोठा फायदा झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
विजय यांचे वडील एस. ए. चंद्रशेखर हे तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. त्यांनी यापूर्वी राजकीय संघटना उभारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना मोठे राजकीय यश मिळाले नव्हते. आता त्यांचे पुत्र विजय यांनी पहिल्याच निवडणुकीत राज्याच्या राजकारणात प्रभावी उपस्थिती निर्माण केल्याने तामिळनाडूच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
निकालानंतर बोलताना एस. ए. चंद्रशेखर यांनी सांगितले की, “गेल्या तीस वर्षांपासून विजय यांना तामिळ जनतेसाठी काहीतरी काम करण्याची इच्छा होती. त्याच विचारातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तामिळनाडूची जनता त्यांच्यावर प्रेम करते आणि भविष्यात ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
तामिळनाडूच्या राजकारणात चित्रपटसृष्टीचा प्रभाव हा नवीन विषय नाही. दाक्षिणात्य राजकारणात अनेक अभिनेते आणि कलावंतांनी मोठी राजकीय कारकीर्द घडवली आहे. माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन, ज्यांना एमजीआर म्हणून ओळखले जाते, त्यांनी अभिनेता म्हणून लोकप्रियता मिळवल्यानंतर राजकारणात ऐतिहासिक यश मिळवले होते. त्यानंतर त्यांच्या सहकलाकार राहिलेल्या जे. जयललिता यांनीही दीर्घकाळ राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली.
द्रमुकचे ज्येष्ठ नेते एम. करुणानिधी यांचेही चित्रपट क्षेत्राशी जवळचे संबंध होते. त्यांनी पटकथा आणि संवादलेखनाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत योगदान दिले होते. अलीकडच्या काळात अभिनेते कमल हासन यांनीही राजकीय पक्ष स्थापन करून निवडणूक राजकारणात प्रवेश केला, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. सुपरस्टार रजनीकांत यांनीही राजकीय क्षेत्रात सक्रिय होण्याचे संकेत दिले होते, परंतु त्यांची राजकीय वाटचाल अपेक्षित वेगाने पुढे सरकू शकली नाही.
या पार्श्वभूमीवर विजय यांच्या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत राज्याच्या सत्ताकारणात प्रभावी स्थान निर्माण केल्याने तामिळनाडूच्या राजकारणात नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे मानले जात आहे. निकालानंतर चेन्नईतील विजय यांच्या निवासस्थानी समर्थक आणि कुटुंबीयांनी जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांनी फटाके फोडत आणि मिठाई वाटत आनंद व्यक्त केला.
विजय यांच्या पक्षाकडून तामिळनाडूमध्ये पारदर्शक प्रशासन, युवकांना प्राधान्य, रोजगारनिर्मिती आणि भ्रष्टाचारमुक्त कारभाराचे आश्वासन देण्यात आले आहे. राज्यातील तरुण मतदारांनी मोठ्या प्रमाणावर विजय यांच्या पक्षाला पाठिंबा दिल्याचेही निकालांमधून दिसून आले.
तामिळनाडूतील या निकालामुळे दक्षिण भारताच्या राजकारणात नवे समीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात विजय यांची राजकीय भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे.
