खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची केली शिफारस
पुणे, दि. ३ : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेची महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने गंभीर दखल घेतली असून पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आयोगाने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत. आयोगाच्या सदस्या शुभांगी तांबट यांनी आज सकाळी पीडित बालिकेच्या घरी भेट देत कुटुंबीयांशी संवाद साधला आणि आयोगाच्या वतीने सहवेदना व्यक्त केल्या.
या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनीही या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी शासनाकडे विशेष सरकारी वकील नियुक्त करण्याची तसेच खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याची शिफारस केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आयोग ठामपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी नसरापूर परिसरात एका पासष्ट वर्षीय आरोपीने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून शिवाजीनगर न्यायालयाने त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेच्या तपासासाठी पोलिसांकडून विविध अंगांनी चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ नसरापूर आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, पीडित कुटुंबाला न्याय द्यावा आणि शासनाने ठोस भूमिका घ्यावी, या मागण्यांसाठी आंदोलकांनी पुणे–बेंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी पीडित चिमुकलीचा मृतदेहही आंदोलनस्थळी आणल्याने वातावरण अत्यंत भावनिक आणि तणावपूर्ण बनले होते. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक सुमारे चार तास विस्कळीत झाली होती.
पोलिस प्रशासनाने आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने परिस्थिती अधिक तणावपूर्ण झाली. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना हटवले. त्यानंतर चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या संपूर्ण घटनेदरम्यान महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे प्रतिनिधीही घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नसरापूर येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी, संतापजनक आणि मानवतेला काळिमा फासणारी आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा मिळावी यासाठी आयोग प्रयत्नशील राहील. पीडित कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत मिळावी यासाठीही शिफारसी करण्यात येणार आहेत.”
आयोगाच्या वतीने पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून तपासाची नियमित माहिती घेतली जात आहे. तसेच बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मतही विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात असून सामाजिक संघटना, महिला संघटना आणि विविध राजकीय पक्षांनी आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. नागरिकांनी शांतता राखावी आणि कायद्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन प्रशासन आणि बाल हक्क आयोगाच्या वतीने करण्यात आले आहे.
