हरिहरेश्वर येथे २४ एप्रिलपासून ‘खगोल दर्शन महोत्सव २०२६’; पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना
मुंबई, दि. २३ : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर येथे २४ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान ‘खगोल दर्शन महोत्सव २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ‘डार्क स्काय सप्ताह’ाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमात खगोलप्रेमी, विद्यार्थी आणि पर्यटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, ॲस्ट्रॉनइरा आणि डार्क स्काय इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. ॲस्ट्रॉनइराच्या संस्थापिका व संचालिका श्वेता कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून स्टारगेझिंग सत्रे आयोजित केली जाणार असून खगोलशास्त्राचा अनुभव प्रत्यक्ष स्वरूपात घेण्याची संधी सहभागीांना मिळणार आहे.
हरिहरेश्वर हे कोकणातील शांत, निसर्गरम्य आणि धार्मिक महत्त्व असलेले पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. समुद्रकिनारे, हिरवाईने नटलेले डोंगर आणि प्रसिद्ध हरिहरेश्वर मंदिरामुळे या ठिकाणाला ‘देवघर’ म्हणूनही ओळख आहे. मुंबईपासून सुमारे चार तासांच्या अंतरावर असलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. येथे असलेल्या एमटीडीसी रिसॉर्टमध्ये प्रीमियर सूट, कॉटेज, सी-फेसिंग कॉटेज आणि एक्झिक्युटिव्ह रूम्ससह निवासाची सुविधा उपलब्ध आहे.
या महोत्सवात आकाश निरीक्षण सत्रे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली खगोल विषयक संवादात्मक प्रदर्शने, प्रकाश प्रदूषणावरील माहितीपर कार्यक्रम तसेच ‘डार्क स्काय’ संवर्धनाबाबत जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकाश प्रदूषणाचे दुष्परिणाम, नैसर्गिक अंधाराचे महत्त्व आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना याबाबत सहभागीांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारचा खगोल व पर्यावरण विषयक महोत्सव आयोजित केला जात असून, पर्यटन आणि विज्ञान यांची सांगड घालत पर्यटकांना वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पर्यावरणपूरक आणि अनुभवाधारित पर्यटनाला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे पर्यटन विभागाने स्पष्ट केले आहे.
या महोत्सवाच्या आयोजनासाठी पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नीलेश र. गटणे यांच्यासह संबंधित अधिकारी समन्वय साधत असून, उपक्रम यशस्वी करण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.
