उद्या सायंकाळी दादर, शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
मुंबई, दि. १२: भारतीय संगीतविश्वातून अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. त्यांच्या जाण्याने हिंदी तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील एक सुवर्ण अध्याय संपुष्टात आला आहे.
गानकोकिळा लता मंगेशकर यांची लहान बहीण असलेल्या आशा भोसले या हिंदी सिनेसृष्टीतील सर्वात बहुगुणी आणि वर्सटाईल गायिकांपैकी एक म्हणून ओळखल्या जात होत्या. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं. हिंदीसह मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहेत.
१९५० च्या दशकात त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीला संघर्षाचा सामना करत त्यांनी हळूहळू स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली. आर डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, एस डी बर्मन आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांसारख्या दिग्गज संगीतकारांसोबत त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली.
क्लासिकलपासून कॅबरे, गझल, पॉप आणि रोमँटिक अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये त्यांनी आपली वेगळी छाप पाडली. ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘इन आँखों की मस्ती’ आणि ‘ओम शांती ओम’ यांसारखी त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत.
त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र आनंद भोसले यांनी माध्यमांना दिली. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन उद्या (सोमवारी) सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर अंत्ययात्रा निघून सायंकाळी ४ वाजता दादर शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांसह पद्मविभूषणसारखे सर्वोच्च सन्मान प्राप्त झाले होते. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आवाजामुळे आणि संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानामुळे त्या भारतीय संगीतविश्वातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणून कायम स्मरणात राहतील.
