दिल्लीत ‘ग्रंथदिंडी’ने महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाचा दिमाखदार प्रारंभ
नवी दिल्ली, दि. ११ : देशाची राजधानी दिल्ली येथे महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्यिक अभिव्यक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त ‘सरहद, पुणे’ आणि महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या महिला शासकीय अधिकारी साहित्य संमेलनाची सुरुवात उत्साहात आणि दिमाखदार ‘ग्रंथदिंडी’ने झाली.
या भव्य ग्रंथदिंडीमध्ये मराठी साहित्य परंपरेचे प्रतीक असलेल्या ग्रंथराज ज्ञानेश्वरीसह विविध साहित्यकृतींचे विधिवत पूजन संमेलनाध्यक्ष लीना मेहंदळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला केंद्रीय सह महालेखाकार सुप्रिया देवस्थळी, निवासी आयुक्त आर. विमला, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, क्रांती खोब्रागडे तसेच नॅशनल बुक ट्रस्टचे सचिव युवराज मलिक यांसह अनेक वरिष्ठ महिला अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पारंपरिक वेशभूषा, मराठी घोषवाक्ये आणि साहित्यप्रेमी वातावरणामुळे दिल्लीत मराठी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली.
संमेलनाच्या मुख्य सत्रात ज्येष्ठ निवृत्त सनदी अधिकारी आणि लेखिका लीना मेहंदळे यांची प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी प्रशासकीय कार्य आणि साहित्यिक संवेदनशीलता यांचा समतोल कसा साधावा याबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, केवळ कार्यालयीन कामकाज पूर्ण करणे हेच प्रशासनाचे कर्तव्य नसून, समाजातील वाईट प्रथा आणि अन्याय दूर करण्यासाठी पदाचा प्रभावी वापर करणे ही खरी लोकसेवा आहे.
मेहंदळे यांनी सांगली जिल्ह्यातील देवदासी प्रथा निर्मूलनासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती देताना सांगितले की, अंधश्रद्धा आणि भीतीला न जुमानता त्यांनी कायद्याच्या बळावर या प्रथेविरुद्ध लढा दिला आणि संबंधित महिलांच्या मुलांच्या पुनर्वसनासाठी ठोस पावले उचलली. या कार्यातून मिळालेल्या समाधानाचा उल्लेख करताना त्या भावूक झाल्या.
याशिवाय त्यांनी भौतिकशास्त्रातील शिस्तबद्ध विचार आणि साहित्याची संवेदनशीलता यांचा संगम साधत काम केल्यास ताण न घेता आनंदाने जबाबदाऱ्या पार पाडता येतात, असा सल्ला उपस्थित महिला अधिकाऱ्यांना दिला.
या संमेलनाच्या माध्यमातून प्रशासनातील महिला अधिकाऱ्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळत असून, समाजाभिमुख कार्य आणि साहित्य यांचा सुंदर मेळ घालण्याचा संदेश देण्यात आला.
