ई-गव्हर्नन्स आणि कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात लोकाभिमुख परिवर्तन
मुंबई/कोल्हापूर, दि. २८ : महाराष्ट्र शासनाच्या १५० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून प्रशासकीय कामकाजात लक्षणीय गती आणि पारदर्शकता आणली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी अमोल येडगे (भा.प्र.से.) यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या उपक्रमांमुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दरी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश केवळ डिजिटल सुविधा निर्माण करणे नसून नागरिकांना जलद, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त सेवा उपलब्ध करून देणे हा आहे.
कोल्हापूर जिल्ह्याचे अधिकृत संकेतस्थळ आता अत्याधुनिक स्वरूपात विकसित करण्यात आले असून ते जागतिक मानकांनुसार कार्यरत आहे. मोबाईलवर सुमारे ३ सेकंद आणि संगणकावर ३.७ सेकंद इतक्या कमी वेळेत संकेतस्थळ उघडत असल्यामुळे नागरिकांना सहज आणि वेगवान सेवा मिळत आहे. गेल्या आठ महिन्यांत ११,७२,२६२ हून अधिक नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह २३ भारतीय भाषांमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आली असून दिव्यांगांसाठी अक्षर आकार बदल आणि उच्च कॉन्ट्रास्ट सुविधा उपलब्ध आहेत. विविध विभागांशी संबंधित एकूण ४७१ वारंवार विचारले जाणारे प्रश्न संकेतस्थळावर उपलब्ध असल्यामुळे नागरिकांना किरकोळ माहितीसाठी कार्यालयात जाण्याची गरज उरलेली नाही.
‘आपले सरकार’ पोर्टलचे शंभर टक्के एकात्मिकरण करून १६ अधिसूचित सेवा पूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या कालावधीत ९,९६,३०२ अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ९,७०,१२४ सेवा म्हणजेच ९७.३७ टक्के अर्ज निर्धारित वेळेत पूर्ण करण्यात आले आहेत. अपीलची सुविधा उपलब्ध असून प्रथम अपिलाचे प्रमाण केवळ ०.००८ टक्के इतके अत्यल्प आहे. प्रशासकीय क्षमता वाढवण्यासाठी ११० अधिकारी व कर्मचारी यांना पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले असून ८५० सेवा केंद्र चालकांपैकी ६९३ जणांना प्रशिक्षित करून ग्रामीण भागातही सेवा पोहोचवण्यात आल्या आहेत.
ई-ऑफिस प्रणालीमुळे कागदमुक्त प्रशासनाकडे मोठे पाऊल टाकण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, प्रांत आणि तहसील स्तरावर एकूण ५६२ कर्मचारी या प्रणालीचा सक्रिय वापर करत आहेत. आतापर्यंत १,५४,६१० फाईल्स प्राप्त होऊन त्यापैकी १,४१,३०६ फाईल्सचा यशस्वी निपटारा करण्यात आला आहे. फाईल निपटाऱ्याचा सरासरी कालावधी १८ दिवस २१ तासांपर्यंत कमी झाला आहे. प्रक्रिया सुलभीकरणाअंतर्गत जमीन व्यवहारासाठी लागणारी कागदपत्रे २१ वरून १२ आणि बिगरशेती परवानगीसाठी १५ वरून १० करण्यात आली आहेत, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचत आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ‘स्मार्ट ऑफिस’ संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे. विविध जनरेटिव्ह एआय साधनांच्या मदतीने अहवाल तयार करणे, भाषांतर करणे आणि निर्णय प्रक्रियेला गती देणे शक्य झाले आहे. मानवी त्रुटी सुमारे ४० टक्क्यांनी कमी होण्याचा आणि निर्णय प्रक्रियेत ३० टक्क्यांनी वेग वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. नागरिकांसाठी ‘सेवादूत २.०’ हा व्हॉट्सअॅप आधारित चॅटबॉट सुरू करण्यात आला असून त्याला १,८०,१२४ प्रतिसाद मिळाले आहेत. या माध्यमातून नागरिकांना सेवा केंद्रांची माहिती, तक्रार नोंदणी आणि शासकीय योजनांची माहिती सहज उपलब्ध होत आहे. आपत्ती व्यवस्थापनातही या चॅटबॉटचा उपयोग करून अफवांवर नियंत्रण आणि तात्काळ सूचना देणे शक्य होत आहे.
भौगोलिक माहिती प्रणालीचा वापर करून जिल्ह्यातील १३ क्षेत्रांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. रेशन दुकाने, आधार केंद्रे आणि शाळांचे नकाशे तयार करून सुविधा नसलेल्या भागांची ओळख पटविण्यात येत आहे. २०१९ आणि २०२१ मधील पुराच्या अनुभवाच्या आधारे नदीकाठच्या गावांचे जिओ-फेन्सिंग करण्यात आले असून संभाव्य धोका ओळखून पूर्वसूचना देणे शक्य झाले आहे. महालक्ष्मी मंदिर परिसरात स्मार्ट गर्दी व्यवस्थापनासाठी रिअल-टाइम नकाशांचा वापर करून सुरक्षेची पातळी वाढविण्यात आली आहे.
तक्रार निवारण व्यवस्थेतही लक्षणीय सुधारणा झाली आहे. ५ डिसेंबर २०२४ ते १० जानेवारी २०२६ या कालावधीत प्राप्त ५४१ तक्रारींपैकी ५३९ तक्रारींचे म्हणजेच ९८ टक्के प्रकरणांचे निराकरण करण्यात आले आहे. डेटा विश्लेषणाच्या आधारे तक्रारींचे स्वरूप ओळखून प्रशासनाने पूर्वनियोजन सुरू केले असून नागरिकाभिमुख निर्णयप्रक्रिया अधिक सक्षम झाली आहे.
एकूणच, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम ई-गव्हर्नन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अचूक डेटा व्यवस्थापन यांच्या साहाय्याने प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम आणि उत्तरदायी बनविण्याचा आदर्श नमुना ठरत आहे. यामुळे प्रशासकीय खर्चात सुमारे ५० टक्क्यांनी बचत झाली असून नागरिकांचा शासनावरचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे दिसून येत आहे.
