टीबीमुक्त भारतासाठी १०० दिवसांच्या विशेष मोहीमेची राज्यात व्यापक अंमलबजावणी
मुंबई, दि. २४ : क्षयरोगमुक्त भारताच्या दिशेने ठोस पावले उचलत भारत सरकारकडून “टीबी मुक्त भारत अभियान – १०० दिवसांची विशेष मोहीम” २४ मार्च २०२६ पासून देशभरात सुरू करण्यात येत आहे. जागतिक क्षयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेची महाराष्ट्रातही व्यापक अंमलबजावणी केली जाणार असून, राज्यातील सर्व जिल्हे आणि शहरी भागांमध्ये ती प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर तसेच राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. राज्यातील आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासन आणि विविध विभागांच्या समन्वयातून या अभियानाला गती देण्यात येणार आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित व्हलनरेबिलिटी मॅपिंगच्या साहाय्याने राज्यातील ११,०९१ जोखीमग्रस्त गावे आणि शहरी वॉर्ड निश्चित करण्यात आले आहेत. या भागांमध्ये पारंपरिक लक्षणांवर आधारित तपासणीऐवजी जोखीमग्रस्त लोकसंख्येची सक्रीय आणि व्यापक तपासणी करण्यात येणार आहे. नि-क्षय पोर्टलवरील एआय विश्लेषणाच्या आधारे सूक्ष्म नियोजन व मार्गनिश्चिती करण्यात आली असून, वृद्ध नागरिक, मधुमेही रुग्ण, कुपोषित व्यक्ती, पीएलएचआयव्ही बाधित, क्षयरुग्णांच्या संपर्कातील लोक, स्थलांतरित कामगार तसेच झोपडपट्टीतील रहिवासी यांची १०० टक्के तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या मोहिमेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हाताळता येणाऱ्या क्ष-किरण यंत्रणांद्वारे तातडीने तपासणी केली जाणार आहे. संशयित रुग्णांना तत्काळ एनएएटी चाचणीसाठी पाठवून निदानाची प्रक्रिया वेगवान करण्यात येणार आहे. दुर्गम व आदिवासी भागांमध्ये आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी नि-क्षय मोबाईल युनिटचा वापर करण्यात येणार असून, दुर्गम भागातील नागरिकांनाही या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
यासोबतच आयुष्मान आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून क्षयरोगासह मधुमेह, उच्च रक्तदाब, अॅनिमिया आणि कुपोषण यांसारख्या आजारांची एकत्रित तपासणी केली जाणार आहे. जिल्हा स्तरावर विविध विभागांचा समन्वय साधून रुग्णांना सर्वंकष सेवा देण्यावर भर दिला जाणार आहे. या मोहिमेत लोकप्रतिनिधी, स्वयं सहाय्यता गट, माय भारत स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येत आहे.
नि-क्षय मित्र उपक्रमाच्या माध्यमातून क्षयरुग्णांना पोषण आहार आणि मानसिक आधार देण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. १०० दिवसांच्या कालावधीत प्रत्येक उच्च जोखीम क्षेत्रात नियमित आयुष्मान आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार असून, राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.
या मोहिमेसाठी दिवसनिहाय आणि गावनिहाय सूक्ष्म आराखडा तयार करण्यात आला असून, संपूर्ण प्रक्रियेचे रिअल-टाइम संनियंत्रण नि-क्षय पोर्टलद्वारे केले जाणार आहे. जिल्हा आणि राज्य स्तरावर सातत्याने आढावा घेऊन मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित केली जाईल.
या अभियानामुळे क्षयरुग्णांचा लवकर शोध, वेळेत उपचार सुरू होणे, उपचारात सातत्य राखणे आणि मृत्यूदरात घट घडवून आणणे शक्य होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने हे अभियान अत्यंत महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे.
