भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचा राजकीय पडसाद
नाशिक/मुंबई : शेकडो महिलांच्या लैंगिक छळाचे गंभीर आरोप असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात नाव जोडले गेल्याने राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वाढत्या दबावाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
व्हायरल व्हिडीओ-फोटोंमुळे वाढला दबाव
अशोक खरातसोबतचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली होती. एका व्हिडीओमध्ये त्या खरात यांची पाद्यपूजा करताना दिसत असल्याचे सांगितले जाते, तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी खरात यांना विठ्ठलाची उपमा दिल्याचा दावा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर नैतिक जबाबदारी स्वीकारण्याचा दबाव वाढत गेला.
राजकीय स्तरावर हालचाली
सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी सकाळीच चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला. याशिवाय, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणात राजीनामा देण्याचा सल्ला दिल्याची चर्चा असली तरी, अंतिम निर्णय हा पक्ष पातळीवर घेतल्याचे सांगितले जात आहे.
गंभीर आरोप आणि तपास
अशोक खरात यांच्यावर गुंगीचे औषध देऊन, संमोहनाचा वापर करून महिलांवर अत्याचार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात पोलिसांच्या हाती दोन लॅपटॉप आणि शंभरहून अधिक व्हिडीओ लागल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तपास अधिक गतीने सुरू असून, अनेक धक्कादायक बाबी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तसेच, चाकणकर या खरात यांनी स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये संचालिका म्हणून कार्यरत असल्याचेही समोर आले आहे. यापूर्वी एका महिलेच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात त्यांनी पीडितेला मदत करण्याऐवजी खरात यांना मदत केल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्र्यांची भेट आणि अंतिम निर्णय
राजीनाम्यापूर्वी रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीही भेट घेतली. या बैठकीनंतर त्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे स्पष्ट झाले.
रोहिणी खडसेंची तीव्र प्रतिक्रिया
या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल माध्यमांवर पोस्ट करत म्हटले आहे :
“म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch… ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली ! शेवटी… कर्म.”
तसेच त्यांनी पुढे म्हटले आहे :
“गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल. माझी मा. मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…”
पुढील कारवाईकडे लक्ष
या प्रकरणात पुढे आणखी कोणती नवी माहिती समोर येते आणि तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय तसेच सामाजिक पातळीवर या घटनेचे मोठे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
