खासदार संजय राऊत यांच्याकडून दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासावर प्रश्न
मुंबई, दि. १४: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडामोडींवर आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी अनेक राजकीय दावे केले.
“राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे अमित शाहांच्या हातात”
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे आता अमित शाह यांच्या हातात गेली आहेत. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्रे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात राहिलेली नाहीत. ती अमित शाह यांच्या नियंत्रणात गेली आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार नाही. उलट अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच भाजपमध्ये विलीन होईल,” असा दावा त्यांनी केला.
तसेच, प्रफुल्ल पटेल यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होऊ नये, असे वक्तव्य केल्याचा संदर्भ देत राऊत म्हणाले, “प्रफुल पटेल जे बोलत आहेत, ते म्हणजे अमित शाहच बोलत आहेत. या सगळ्या घडामोडींमध्ये भाजपचा अदृश्य हात आहे.”
“अजित पवार एकखांबी तंबू होता”
राऊत यांनी पुढे म्हटले की, “अजित पवार हा एकखांबी तंबू होता. तो कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा तोंडे फुटली आहेत.” पक्षातील अंतर्गत वादांवर भाष्य करत त्यांनी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर पवार कुटुंबाकडून होत असलेल्या आरोपांचा उल्लेख केला. “रोहित पवार यांनी काही पुरावे समोर आणले आहेत. त्यावर प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनीही पुराव्यांवर आधारित उत्तर द्यावे,” असे ते म्हणाले.
विमान अपघाताच्या तपासावर प्रश्न
अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बोलताना राऊत यांनी शंका उपस्थित केल्या. “या अपघाताचा पूर्ण तपास होणार नाही. त्यातून ठोस निष्कर्ष बाहेर येणार नाही. अजित पवार ज्या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते, त्या कंपनीचा बेनामी मालक कोण? त्या कंपनीमागे अदृश्य हात आहेत का? याचा सखोल तपास व्हायला हवा,” अशी मागणी त्यांनी केली.
नरहरी झिरवाळ यांनी राजीनामा द्यावा
दरम्यान, नरहरी झिरवळ यांच्या संदर्भातही खासदार राऊत यांनी टीका केली. “नरहरी झिरवाळ यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा द्यावा. त्यांच्या कार्यालयावर एसीबीने कारवाई करून ते सील केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय अशी कारवाई होऊ शकत नाही. लाचखोरी प्रमाणाबाहेर गेल्यानंतर ही कारवाई झाली,” असा आरोप त्यांनी केला.
