मोठी बातमी: शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती
पुणे, दि. ९: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आज (९ फेब्रुवारी २०२६) पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना खोकला आणि श्वास घेण्यास काहीसा त्रास जाणवत होता. बारामतीतील त्यांच्या ‘गोविंद बाग’ निवासस्थानी डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर, खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने पुण्याला हलवण्यात आले आहे.
रुबी हॉल क्लिनिकमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने शरद पवार यांची सविस्तर तपासणी केली असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉ. अभिजीत लोढा यांनी माध्यमांशी बोलताना दिली. ते म्हणाले, “शरद पवार यांना शारीरिक थकवा जाणवल्यामुळे छातीत कफ झाला आहे. आम्ही सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या केल्या असून उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आहे. ते सर्वांशी नॉर्मल बोलत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, पवार साहेब सध्या आयसीयू (ICU) मध्ये नसून खाजगी रूममध्ये आहेत. सविस्तर रिपोर्ट आल्यानंतर उपचारात काही बदल करायचे असल्यास आम्ही निर्णय घेऊ. सध्या घाबरण्यासारखे काहीही नाही.”
रोहित पवारांचे कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन
शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.
मी सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो रुग्णालयात तुम्ही येऊ नका. त्यांची प्रकृती स्थिर आहे. काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही इकडे येऊ नका. त्यांना थोड्याश्या प्रमाणात कफ आहे. थोडे दिवस इथं ठेवलं जाईल. ते आय सी यू मध्ये नाहीत तर खाजगी रूममध्ये दाखल आहेत, अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे. पवार साहेबांच्या तब्येतीबद्दल आम्ही सर्वजण रुबी हॉल या हॉस्पिटलमध्ये आलो आहोत आणि तेथील डॉक्टर अभिजीत लोढा आपल्या सर्वांना शरद पवार यांच्या प्रकृती बद्दल माहिती सांगतील.
गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम शरद पवार यांच्यासाठी अत्यंत तणावाचा राहिला आहे. २८ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. या धक्क्यातून सावरत असतानाच राज्याच्या १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका आणि नुकताच झालेला शपथविधी यामुळे पवार साहेबांच्या धावपळीत वाढ झाली होती. याच शारीरिक श्रमामुळे त्यांना कफ आणि थकव्याचा त्रास झाल्याचे सांगण्यात येत आहे.
रुग्णालयात नेत्यांची मांदियाळी
पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील अनेक नेत्यांनी फोनवरून संवाद साधला आहे. सुप्रिया सुळे आणि कुटुंबातील इतर सदस्य रुग्णालयात उपस्थित असून पुढील दोन-तीन दिवस साहेब डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहतील अशी शक्यता आहे.
