वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर उमेदवारी अर्ज मागे
पुणे, दि. ९ : विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी पुण्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांत महायुतीसमोर निर्माण झालेला अंतर्गत उमेदवारीचा पेच अखेर दूर झाला आहे. शिवसेनेचे मंगेश चिवटे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मित्रपक्षांतील संभाव्य संघर्ष टळला आहे. वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर दोन्ही उमेदवारांनी माघार घेतली असून, या घडामोडींनंतर निवडणुकीतील पुढील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.
मंगेश चिवटे म्हणाले, वरिष्ठ नेतेच बोलतील
पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनीही निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल केल्याने महायुतीतील जागावाटप आणि समन्वयाचा प्रश्न निर्माण झाला होता.
अखेर पक्षातील वरिष्ठांकडून माघार घेण्याचे निर्देश मिळाल्यानंतर चिवटे यांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यानंतर माध्यमांनी त्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत बोलतील आणि आपण लहान कार्यकर्ता असल्याचे सांगितले. त्यामुळे या निर्णयावर शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात, याची उत्सुकता आहे.
भैय्या मानेंची माघार; हसन मुश्रीफ यांची मध्यस्थी
पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपने स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली होती. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ऊर्फ भैय्या माने यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी केल्याने महायुतीसमोर दुसरा पेच उभा राहिला होता.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मानेंशी चर्चा केली. तसेच जनस्वराज्य पक्षाचे विनय कोरे आणि सुमित कदम यांनीही त्यांना माघार घेण्याची विनंती केल्याचे मानेंनी सांगितले. महायुतीतील एकत्रित लढतीत अडथळा निर्माण होऊ नये, या भूमिकेतून त्यांनी उमेदवारी मागे घेतली.
माघारीचे कारण स्पष्ट करताना भैय्या माने म्हणाले, “नेमकं कारण काय माघार घेण्याचं? शक्ती प्रदर्शन कार्यकर्त्यांची भावना होती, जिवंतपणा जो कार्यकर्ता असतो, त्याच्यातून ते शक्ती प्रदर्शन झालेलं होतं, दबाव काही नाही, पण महायुती म्हणून मला काल हसन मुश्रीफ भेटले, जनस्वराज्याचे विनय कोरे, सुमित कदम त्यांनी विनंती केली की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण अपक्ष निवडणूक लढवून आपण महायुतीत थोडासा गोंधळ आणि त्यामुळे आपण माघार घ्यावी आणि त्यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत मी मागे घेतलं आहे. मी माघार घेतल्याने नक्कीच महायुतीला फायदा होईल, मला आश्वासन वगैरे काही दिलेलं नाही.”
त्यांच्या म्हणण्यानुसार, उमेदवारी मागे घेण्यासाठी कोणतेही आश्वासन देण्यात आलेले नाही. कार्यकर्त्यांनी केलेले शक्तिप्रदर्शन हे त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी होते, दबाव निर्माण करण्यासाठी नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अपक्ष उमेदवारांमुळे निवडणुकीची चुरस कायम
दोन्ही बंडखोर उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी पुणे शिक्षक मतदारसंघातील लढतीचे चित्र पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनीही या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अधिकृत पक्षीय उमेदवारांसोबत अपक्ष उमेदवारांची भूमिका निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते.
विधानपरिषदेच्या पाचही जागांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी झालेल्या या घडामोडींमुळे महायुतीतील संभाव्य मतविभाजन टाळण्याचा प्रयत्न झाला आहे. मात्र, प्रत्यक्ष निवडणुकीत मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जातो, हे उमेदवारांच्या अंतिम यादीवर आणि प्रचारादरम्यान तयार होणाऱ्या समीकरणांवर अवलंबून असेल.

