प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असणाऱ्या मुंबईसारख्या शहरात नागरिकांना तीन ते चार वर्षे या सुविधेपासून वंचित ठेवले गेले जो एक गंभीर अन्याय – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी मुंबई/पनवेल, दि. ८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले तसेच मुंबईतील विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. सर्व मान्यवरांचे स्वागत करत, मोदी यांनी उपस्थितांना हार्दिक शुभेच्छा दिल्या.
मुंबईची दीर्घकाळची प्रतीक्षा संपली असून शहराला आता दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाला आहे असे सांगून पंतप्रधानांनी अधोरेखित केले की हा विमानतळ आशियातील सर्वात मोठ्या कनेक्टिव्हिटी हबपैकी एक म्हणून या प्रदेशाला प्रस्थापित करण्यात मोठी भूमिका बजावेल. मुंबईला आता पूर्णपणे भुयारी मेट्रो मिळाली आहे, ज्यामुळे प्रवास सोपा होईल आणि प्रवाशांचा वेळ वाचेल असे ते म्हणाले. मोदी यांनी भुयारी मेट्रोचा उल्लेख विकसनशील भारताचे जिवंत प्रतीक असा केला आणि नमूद केले की मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात, ऐतिहासिक इमारतींचे जतन करत या भुयारी मेट्रो सेवेचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यांनी या प्रकल्पात सहभागी कामगार आणि अभियंत्यांचे अभिनंदन केले.
भारत येथील युवकांसाठी असंख्य संधी प्रदान करतो हे अधोरेखित करत, पंतप्रधानांनी देशभरातील असंख्य आयटीआयना उद्योगाशी जोडण्याच्या उद्देशाने अलिकडेच शुभारंभ करण्यात आलेल्या ६०,००० कोटींच्या पीएम सेतू योजनेचा उल्लेख केला. त्यांनी नमूद केले की आजपासून महाराष्ट्र सरकारने शेकडो आयटीआय आणि तंत्र विद्यालयांमध्ये नवीन कार्यक्रम सुरू केले आहेत. या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना ड्रोन, रोबोटिक्स, इलेक्ट्रिक वाहने, सौर ऊर्जा आणि हरित हायड्रोजन सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळेल, असे मोदी म्हणाले. त्यांनी महाराष्ट्रातील युवकांना शुभेच्छा दिल्या.

पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचे सुपुत्र, लोकनेते दि. बा. पाटील यांना आदरांजली वाहिली आणि समाज आणि शेतकऱ्यांप्रति त्यांच्या समर्पित सेवेचे स्मरण केले. ते म्हणाले की पाटील यांचा सेवा भाव सर्वांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यांचे जीवन सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्यांना सतत प्रेरणा देत राहील.
“आज, संपूर्ण देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी वचनबद्ध आहे – असा भारत जिथे गती आणि प्रगती दोन्ही आहे, जिथे लोकहित सर्वोपरि आहे आणि सरकारी योजना प्रत्येक नागरिकाचे जीवन सुखकर बनवत आहेत असे नमूद करून मोदी यांनी अधोरेखित केले की गेल्या अकरा वर्षांमध्ये या भावनेने देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात विकास प्रयत्नांना मार्गदर्शन केले आहे.
आजच्या कार्यक्रमाने भारताच्या विकासाच्या प्रवासाची गती कायम ठेवली आहे असे मोदी म्हणाले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा विकसित भारताचा दृष्टीकोन प्रतिबिंबित करणारा प्रकल्प असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर बांधलेल्या या विमानतळाचा आकार कमळाच्या फुलासारखा असून, तो संस्कृती आणि समृद्धीचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले. पंतप्रधान म्हणाले की, हा नवीन विमानतळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना युरोप आणि मध्य पूर्वेतील सुपरमार्केटशी जोडेल, त्यामुळे ताजी उत्पादने, फळे, भाज्या आणि मत्स्य उत्पादने जागतिक बाजारपेठेत जलद पोहोचू शकतील. या विमानतळामुळे आजुबाजूच्या लघु आणि मध्यम उद्योगांचा निर्यात खर्च कमी होईल, गुंतवणुकीला चालना मिळेल आणि नवीन उद्योगांच्या स्थापनेला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी नवीन विमानतळासाठी महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेचे अभिनंदन केले.
स्वप्ने पूर्ण करण्याचा संकल्प असतो आणि नागरिकांना जलद विकास देण्याची प्रबळ इच्छाशक्ती असते तेव्हा त्याचे परिणाम निश्चित असतात, असे नमूद करून, भारताचे हवाई क्षेत्र या प्रगतीचा प्रमुख दाखला आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. २०१४ साली पदभार स्वीकारल्यानंतर केलेल्या आपल्या भाषणाचा संदर्भ देत, हवाई चप्पल घालणाऱ्यांनाही विमानाने प्रवास करता यावा, या आपल्या दृष्टिकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. हे स्वप्न साकार करण्यासाठी देशभरात नवीन विमानतळ उभारणे आवश्यक होते, असे ते म्हणाले. सरकारने ही मोहीम गांभीर्याने घेतली आणि गेल्या अकरा वर्षांत एकापाठोपाठ एक नवीन विमानतळ बांधले जात असल्याचे त्यांनी सांगितले. २०१४ मध्ये भारतात केवळ ७४ विमानतळ होते. आज ही संख्या १६० च्या पुढे गेली आहे, असे ते म्हणाले.
लहान शहरांमध्ये विमानतळाच्या बांधकामामुळे रहिवाशांना हवाई प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी, सरकारने सामान्य नागरिकांना परवडणारी विमान तिकिटे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘उडान’ (UDAN) योजना सुरू केली. गेल्या दशकभरात, लाखो लोकांनी या योजनेंतर्गत आपला पहिला हवाई प्रवास केला, आणि दीर्घ काळापासूनचे आपले स्वप्न पूर्ण केले, असे ते म्हणाले.
नवीन विमानतळांचे बांधकाम आणि उडान योजनेमुळे नागरिकांना सुविधा मिळाल्या आहेत यावर भर देऊन, मोदी यांनी, भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे हे अधोरेखित केले. भारतीय विमान कंपन्या सातत्याने विस्तार करत असून शेकडो नवीन विमानांसाठी मागणी नोंदवत आहेत, असे त्यांनी नमूद केले. ही वाढ पायलट, केबिन क्रू, अभियंते आणि ग्राउंड वर्कर्ससाठी नवीन संधी निर्माण करत आहे असे ते म्हणाले.
विमानांची संख्या वाढते, तशी देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांची मागणी देखील वाढते, हे निदर्शनास आणून, ही गरज पूर्ण करण्यासाठी भारत देशांतर्गत नवीन सुविधा विकसित करत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. या दशकाच्या अखेरीपर्यंत भारताला एक प्रमुख एमआरओ (देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहाल) केंद्र म्हणून स्थापित करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे भारतातील तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य नवीन संधीही निर्माण होत आहेत, असे त्यांनी नमूद केले.
“भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे आणि त्याची ताकद त्याच्या तरुणाईत आहे”, पंतप्रधान म्हणाले. सरकारचे प्रत्येक धोरण तरुणांसाठी जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर केंद्रित आहे, यावर त्यांनी भर दिला. पायाभूत सुविधांमधील वाढत्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती होते, असे त्यांनी नमूद करून, त्यांनी 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाचे उदाहरण दिले. ते पुढे म्हणाले की जेव्हा व्यापार वाढतो आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला गती मिळते तेव्हा रोजगार निर्माण होतो.
आज उद्घाटन झालेली मेट्रो मार्गिका काही मागील प्रशासनांच्या कृतींची आठवण करून देते याकडे लक्ष वेधत तिच्या पायाभरणी समारंभात सहभागी झाल्याचे स्मरण मोदींनी केले, त्यावेळी लाखो मुंबई कुटुंबांमध्ये हालअपेष्टा कमी होण्याची आशा निर्माण झाली होती. तथापि, त्यानंतरच्या सरकारने हा प्रकल्प थांबवला, ज्यामुळे देशाला हजारो कोटींचे नुकसान झाले आणि अनेक वर्षे दीर्घकाळ त्रास सहन करावा लागला असे त्यांनी निदर्शनास आणले. ही मेट्रो मार्गिका पूर्ण झाल्यानंतर, दोन ते अडीच तासांचा प्रवास आता फक्त ३० ते ४० मिनिटांवर येईल असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असणाऱ्या मुंबईसारख्या शहरात नागरिकांना तीन ते चार वर्षे या सुविधेपासून वंचित ठेवले गेले जो एक गंभीर अन्याय आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
पंतप्रधानांनी सांगितले की, भारताची आर्थिक राजधानी आणि सर्वात उत्साही शहरांपैकी एक असलेल्या मुंबईला २००८ च्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. त्यावेळी सत्तेत असलेल्या सरकारने दुबळेपणा दाखवत दहशतवादासमोर शरणागती पत्करली, ही टिप्पणी त्यांनी यावेळी केली. मोदी यांनी सध्याचे विरोधी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी गृहमंत्र्यांनी अलिकडेच केलेल्या खुलाशाचा उल्लेख केला, ज्यांनी असा दावा केला होता की मुंबई हल्ल्यानंतर भारताचे सशस्त्र दल पाकिस्तानवर हल्ला करण्यास तयार होते. त्यांनी नमूद केले की संपूर्ण देश अशा कारवाईला पाठिंबा देतो. तथापि, विरोधी पक्षनेत्याच्या मते, सरकारने परकीय देशाच्या दबावामुळे लष्करी कारवाई थांबवली. मुंबई आणि देशवासीयांच्या भावना दुखावणाऱ्या या निर्णयावर कोणाचा प्रभाव होता हे विरोधकांनी स्पष्ट करावे, अशी मागणी पंतप्रधानांनी केली. विरोधी पक्षाच्या कमकुवतपणामुळे दहशतवाद्यांना प्रोत्साहन मिळाले आणि राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड झाली, ज्याची किंमत देशाला निष्पाप जीवांनी मोजावी लागली, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, जपानचे भारतातील राजदूत ओनू केईची, वन मंत्री गणेश नाईक, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार नरेश म्हस्के, खासदार धैर्यशील पाटील, आमदार सर्वश्री रवींद्र चव्हाण, अमित साटम, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, विक्रांत पाटील, मंदाताई म्हात्रे, अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांच्यासह लोकप्रतिनिधी व विविध मान्यवर उपस्थित होते.
