मुधोजीराजे भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई/नागपूर, दि. ५: मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील याचं आंदोलन दोन दिवसांपूर्वी समाप्त झालं. राज्य सरकारतर्फे गठीत समितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व सदस्य यांनी जरांगे पाटील यांची भेट घेत त्यांच्या जवळपास सर्व मागण्या मान्य करत असल्याचे जाहीर केले. व यानंतर थोड्याच वेळात राज्य सरकारने एक शासन निर्णय जाहीर करत जरांगेंच्या मागण्यांना मूर्त स्वरूप आणलं. परंतु, एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करण्याची मागणी करताना दिसले त्याच वेळी नागपूर भोसले राज घराण्याचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी सुरुवातीपासून वेगळी भूमिका मांडली. म्हणजे मराठ्यांना आरक्षण मिळवं पण ते ओबीसी प्रवर्गातून नव्हे तर स्वतंत्र मिळावं. जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्यावर काही वेळातच सरकारने निर्गमित केलेल्या ‘जीआर’ चं विश्लेषण खुद्द मराठा आंदोलनांतील अग्रणी समजल्या जाणाऱ्या विनोद पाटील आदि मंडळींकडून करण्यात आलं व त्याच्यातील त्रुटींकडे त्यांनी अंगुलीनिर्देश केला.
या साऱ्या पार्श्वभूमीवर आज मुधोजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेत निवेदनाद्वारे केलेल्या मागणीने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून नागपूरकर मुधोजीराजे भोसले यांनी मराठ्यांना सरसकट आरक्षणाची मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्या नंतर मुधोजीराजेंनी फेसबुक वर पोस्त करत आपल्या भावना व्यक्त केल्या व सरसकट सर्व मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या जरांगे पाटील यांच्या मागणीवरही प्रश्नचिह्न उपस्थित केले आहे.
जाणून घ्या मुधोजीराजे भोसले नेमकं काय म्हणाले:
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस जी यांची भेट घेऊन निवेदन दिले. मराठा आरक्षणाच्या अनुषंगानें नुकतेचं मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई च्या आझाद मैदानांवर आंदोलन झाले. यात मराठ्यानां काय मिळालं? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला माझा पांठिबा आहे.
परंतु त्यांनी जी मागणी केली की मराठ्यांनां ‘ओबीसी’तून आरक्षण द्या. ह्या मागणीतून मराठ्यानां काय साध्य झालं? कारण मराठवाड्याच्या काही जिल्हायात ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यात अर्थतांतचं काही त्रुटया आहेतचं. परंतु ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना लाभ नक्कीचं मिळावा. कागदपत्राची पुर्तता करण्यात ह्या लाभाचा टक्का निश्चितचं घसरणार यात मात्र शंका नाही.
आश्यात उर्वरीत अंदाजे २.५० करोड मराठ्याचं काय? आसा प्रश्न मराठ्यानां सतावतो आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझं व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण मिळावे जेणे करून हा पेच निर्माण होणार नाही. संपर्ण महाराष्ट्रातील मराठ्यानां मराठा म्हणूनचं “मराठा आरक्षणाचा” फायदा होईल.
तरी कृपया मराठ्यांना मराठा म्हणूनच सरसकट आरक्षण कृपया द्यावे. जेणे करून ५८ लाख कुणबी नोंदी वाले मराठे + उर्वरीत अंदाजे २.५० करोड मराठ्यांना “मराठा आरक्षणाचा” फायदा होईल. माझी या निवेदानाच्या माध्यामातुन शासनाला एक विनंती आहे की, मराठ्याचं नुकसान कृपया होऊ देऊ नका !
