केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पुणे गट केंद्राच्या कल्याणकारी संघटनेच्या वतीने व्यापक वृक्षारोपण मोहीमेचे आयोजन
पुणे, दि. ७: केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पुणे गट केंद्राच्या कल्याणकारी संघटनेच्या (CWA), वतीने आज इनर व्हील क्लब, निगडी प्राईड यांच्या सहकार्याने पर्यावरण संवर्धनासाठीचा एक उल्लेखनीय उपक्रम म्हणून गट केंद्राच्या परिसरात व्यापक वृक्षारोपण मोहीमेचे आयोजन केले.
या मोहिमेत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे अधिकारी, कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय – विशेषतः महिला आणि मुलांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. मोठ्या संख्येने एकत्र येत या सगळ्यांनी या उदात्त उपक्रमात आपापले योगदान दिले. इनर व्हील क्लबने विविध प्रकारची रोपे उपलब्ध करून देत, सामाजिक आणि पर्यावरणीय जबाबदारीप्रती आपली दृढ बांधिलकी व्यक्त केली. DWGJ.jpg)
या कार्यक्रमाला भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या, पुणे इथल्या गट केंद्राचे उपमहानिरीक्षक वैभव निंबाळकर मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कल्याणकारी संघटनेच्या अध्यक्षा अनुजा निंबाळकर याही या देखील या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. याशिवाय, इनर व्हील क्लब, निगडी प्राईडचे पदाधिकारी आणि सदस्यही उपस्थित होते. या सगळ्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला आणि उपस्थितांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन दिले.
यावेळी वैभव निंबाळकर यांनी उपस्थितांना संबोधित केले. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारीची गरज त्यांनी अधोरेखित केली. आपल्या पृथ्वीला अधिक हरित ठेवणे आणि स्वच्छता राखणे आपले कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण ही केवळ पर्यावरण संरक्षणाची कृती नाही, तर तो आपण भावी पिढ्यांसाठी सोडून जाणारा एक वारसा आहे असे ते म्हणाले.

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कल्याणकारी संघटनेच्या प्रमुख अनुजा निंबाळकर यांनीही वैभव निंबाळकर यांच्या विचारांशी सहमती दर्शवली. आज इथे जमलेल्या माता, पृथ्वी या आपल्या दुसऱ्या मातेची सेवा करत आहेत. वृक्षारोपण हे संगोपन, निगा आणि शाश्वत भविष्याप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सर्व सहभागींचे आभार मानून या कार्यक्रमाचा समारोप झाला. यानिमित्ताने सर्व उपस्थितांनी भविष्यातही केंद्रीय राखीव पोलीस दलाअंतर्गत तसेच समाजात पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी असेच प्रयत्न सुरू ठेवण्याची प्रतिज्ञाही घेतली.
(1)IHYT.jpg)
* * *
पीआयबी मुंबई | निलिमा चितळे/तुषार पवार/दर्शना राणे
