“हा मंच चुकीच्या माहितीविरुद्ध दक्ष वॉचटॉवर म्हणून काम करेल” – प्रतापराव जाधव
मुंबई/नवी दिल्ली, दि. ३०: पारंपरिक औषधांच्या क्षेत्रात ग्राहक संरक्षण आणि नियामक देखरेख मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून, आयुष मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज नवी दिल्लीतील आयुष भवन येथे आयुष सुरक्षा पोर्टलचा प्रारंभ केला. आयुष क्षेत्रात जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवण्याच्या मंत्रालयाच्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वाचा क्षण म्हणून पत्रकार परिषदेत या पोर्टलचा प्रारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात बोलताना मंत्री म्हणाले, “आयुष सुरक्षा पोर्टल सुरू करून, आम्ही नागरिकांना आणि व्यावसायिकांना आयुष प्रणालींच्या अखंडतेचे रक्षण करण्यात सक्रिय सहभागी होण्यासाठी सक्षम करत आहोत. हा मंच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींविरुद्ध एक दक्ष वॉचटॉवर (निरीक्षक) म्हणून काम करेल आणि फक्त सुरक्षित आणि विश्वासार्ह उत्पादने लोकांपर्यंत पोहोचतील याची खातरजमा करेल.”
“आयुष सुरक्षा पोर्टल हे आयुष परिसंस्थेत औषधोपचार आणि नियामक अभिसरणात आणि दक्षतेत लक्षणीय प्रगती दर्शवते. राज्य परवाना अधिकारी, राष्ट्रीय औषधोपचार केंद्रे आणि प्रमुख नियामक हितधारकांकडून डेटा एकत्रित करून, हे पोर्टल, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि औषधांच्या दुष्परिणामांवर रिअल-टाइम देखरेख, पद्धतशीर विश्लेषण आणि समन्वित कारवाई सुलभ करते. आम्ही ते जनतेसाठी उपलब्ध करून दिले आहे जेणेकरून कोणताही नागरिक पोर्टलद्वारे दिशाभूल करणाऱ्या जाहिराती किंवा एडीआरची थेट तक्रार करू शकेल,” असे आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाने, रिट याचिका (नागरी) क्रमांक ६४५/२०२२ मध्ये ३० जुलै २०२४ रोजी दिलेल्या आदेशानुसार आयुष सुरक्षा पोर्टल विकसित करण्यात आले आहे, ज्यामध्ये न्यायालयाने दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि औषधांच्या दुष्परिणामांशी निगडित डेटाचे निरीक्षण आणि प्रकाशन करण्यासाठी केंद्रीकृत डॅशबोर्डच्या आवश्यकतेवर भर दिला होता. सिद्ध येथील केंद्रीय संशोधन परिषदेच्या (सीसीआरएस) तांत्रिक सहकार्याने विकसित केलेले आणि राष्ट्रीय औषध दक्षता कार्यक्रमाशी संयोजित केलेले हे पोर्टल अविरत डिजिटल प्रक्रियेद्वारे ग्राहकांना, आरोग्यसेवा व्यावसायिकांना आणि नियामक अधिकाऱ्यांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि औषधांच्या दुष्परिणामांविषयी अहवाल आणि निरीक्षण करण्याची अनुमती देते.
हे पोर्टल सुरू झाल्याने, आयुष मंत्रालयाकडे आता नोंदवलेल्या प्रकरणांचा केंद्रीकृत आणि सुलभ डॅशबोर्ड आहे, जो रिअल-टाइम ट्रॅकिंग, जलद नियामक कारवाई आणि तपशीलवार डेटा विश्लेषण सक्षम करतो. ही प्रणाली नागरिकांना त्यांच्या समस्या व्यक्त करण्यासाठी थेट मार्ग प्रदान करण्याबरोबरच त्यांच्या समस्यांवर केलेल्या कारवाईची पारदर्शक दृश्यमानता सुनिश्चित करते. आयुष सुरक्षा पोर्टल जबाबदार प्रशासन, तथ्य आधारित पद्धती आणि भारताच्या पारंपरिक औषध प्रणालींवर विश्वास आणि अवलंबून असलेल्या लाखो नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी मंत्रालयाची ठाम वचनबद्धता प्रतीत करते.
