डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला मानाचा मुजरा – देशभरातील प्रमुख राज्यांच्या राजधानीत प्रथमच एकाच वेळी भव्य पदयात्रा
मुंबई, दि. १३: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली म्हणून केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने आज १३ एप्रिल २०२५ रोजी काढलेल्या ‘जय भीम पदयात्रेला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही ऐतिहासिक पदयात्रा देशभरातील प्रमुख राज्यांच्या राजधानी शहरांमध्ये एकाच वेळी आयोजित करण्यात आल्याने आंबेडकर जयंतीच्या राष्ट्रीय स्तरावरील उत्सवाचे हे एक वैशिष्ट्य ठरले.
मुंबईतील पदयात्रेचे नेतृत्व केंद्रीय युवक व्यवहार व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे यांनी केले. या पदयात्रेत २००० हून अधिक ‘माय भारत’ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. पदयात्रेचा मार्ग नरिमन पॉईंट ते मंत्रालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा असा होता. या उपक्रमाद्वारे न्याय, समानता आणि बंधुतेच्या मूल्यांबाबत एकता आणि बांधिलकी व्यक्त करण्यात आली. भारताच्या लोकशाहीच्या वारशाबद्दल राज्यमंत्री खडसे यांनी अभिमान व्यक्त केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीची प्रासंगिकता अधोरेखित केली. कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना, खडसे म्हणाल्या, “आपल्याला अशा देशात जन्म घेतल्याचा अभिमान वाटतो, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर पुरुषांनी समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आपल्याला स्वातंत्र्य दिले आणि पुढचा मार्ग दाखवला.” आंबेडकर जयंती साजरी करणे ही आपली जबाबदारी आहेच, पण त्यांच्या विचारांचे आपल्या जीवनात पालन करणे आणि त्यांना पुढे नेणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पदयात्रेते विविध बाबी महत्त्वाचे आकर्षण ठरल्या. यात सहभागी राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेते, आमदार आणि आदर्श युवकांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. पदयात्रेच्या मार्गावर प्रेरणा स्थळांवर डॉ. आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार मांडण्यात आले होते. सामाजिक न्यायावर आधारित पथनाट्य तसेच उभारण्यात आलेल्या संकल्प स्थानी तरुणांनी राज्य घटनेच्या मूल्यांबाबत आपली निष्ठा पुन्हा एकदा व्यक्त केली.
कार्यक्रमाचा शेवट एका सामूहिक अभिवादनाने झाला. मंत्रालयातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा परिसर स्वच्छ करण्यात आला. ही प्रतीकात्मक कृती देशभरातील इतर शहरांमध्येही करण्यात आली. देशभरातील विविध जिल्ह्यांमध्ये देखील आज पुतळे स्वच्छ करण्याचे उपक्रम व पुष्पांजली अर्पणाचे कार्यक्रम झाले.
‘जय भीम पदयात्रा’ ही भारतीय राज्य घटनेच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ आयोजित 24 मासिक पदयात्रांपैकी नववी पदयात्रा होती. तरुणांना डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या शाश्वत मूल्यांसोबत जोडण्यासाठी या पदयात्रांचे आयोजन केले जात आहे.
महाराष्ट्र सरकारचे मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री राजकुमार बडोले, माजी खासदार अमर साबळे, महाराष्ट्र व गोव्यातील एनवायकेएस राज्य संचालक प्रकाश कुमार मनुरे, एनएसएसचे महाराष्ट्र विभागीय संचालक अजय शिंदे तसेच क्रीडा व युवक कल्याण विभागाचे अधिकारी मुंबईतील पदयात्रेला उपस्थित होते. केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालयाने देशभरातील तरुण नागरिकांना www.mybharat.gov.in या माय भारत पोर्टलवर नोंदणी करून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, आणि लोकशाही, सन्मान आणि एकतेच्या मार्गावर एकत्र वाटचाल करण्यासाठी निमंत्रित केले आहे.
