एसटीचे ब्रँड अँबेसिडर म्हणून अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती
मुंबई, दि. २२ : राज्यात रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात विविध चालक संघटनांकडून संपाची हाक देण्यात आली असताना, दुसरीकडे परिवहन विभागाने एसटी बससाठी ब्रँड अँबेसिडर म्हणून अभिनेते रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती केल्याने या विषयाला वेगळीच दिशा मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक स्तरावर चर्चा रंगू लागली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या प्रतिमेला नवे रूप देण्यासाठी आणि जनतेशी भावनिक नाळ जोडण्यासाठी रितेश देशमुख व जेनेलिया देशमुख यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड केली आहे. नियुक्तीनंतर रितेश देशमुख यांनी आपल्या बालपणीच्या एसटी प्रवासाच्या आठवणींना उजाळा देत मराठी भाषेबाबतही स्पष्ट भूमिका मांडली.
काय म्हणाला रितेश देशमुख?
रितेश म्हणाला, “सर्वप्रथम मी प्रतापजींचा आभारी आहे. त्यांनी माझी आणि जेनेलिया यांची ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली. खरंतर मी लहानपणी माझ्या वडिलांसोबत प्रवास केलाय. माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा एसटीमधून झालेला आहे. परिवहन खातंही त्यांनी सांभाळलं आहे. कुठेतरी जाऊन मला वाटतं की एसटी बस ही माझ्या लहानपणाचा एक भाग होती. त्यात एसटीचा ब्रँड अँबेसिडर म्हणून मी आज नियुक्त झालो याचा मला अभिमान आहे.माझ्या आणि जेनेलियाच्यापरिने जे काही सहकार्य करण्याची गरज असेल ते आम्ही करण्यास तयार आहोत.”
रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीवर भूमिका
सध्या सुरू असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रितेश देशमुख यांनी मराठी भाषेबाबत आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, “महाराष्ट्र मध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे. जे कोणी प्रवास करणारे मराठी भाषिक असतात. ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी अनिवार्य बोलली पाहिजे. त्याचप्रकारे आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे” असा रितेशने सांगितले.
बालपणीच्या एसटी प्रवासाच्या आठवणी
रितेशने आपल्या वडिलांसोबत केलेल्या एसटी प्रवासाच्या आठवणी सांगताना भावनिक स्वर घेतला. तो म्हणाला, “लहानपणी साहेब लातूर, पुणे इतर भागांमध्ये एसटीने जायचे. नेहमी आल्यावर आम्हाला सांगायचे, कसे दोरी ओढायचे, कसे पैसे आम्ही द्यायचो. जो प्रवास त्यांनी पाहिलाय तोच आम्ही त्यांच्यासोबत लहान असताना केला आहे. त्यांचा अजूनही एक फोटो बाभळगावमध्ये आहे. यात ते एसटी च्या आत बसले आहेत. तो फोटो आमच्या संपूर्ण परिवाराच्या अत्यंत जवळचा फोटो आहे. बसमध्ये साहेब जिथे बसले होते ते त्यांच्या आवडती जागा होती. ती होती खिडकीत बसण्याची जागा. एका बाजूने वारं यायचं, आणि झोप लागायची तिथे.” यासोबतच त्यांनी जेनेलियाच्या प्रवास अनुभवाचाही उल्लेख केला. तो म्हणाला, “जेनेलियाने मुंबईच्या बसमध्ये प्रवास केलाय. त्यांचा जन्म लातूरचा नसल्यामुळे त्या एसटी बसने फिरू शकला नाही.”
एसटीच्या भविष्यातील योजनांवर भाष्य
रितेश देशमुख पुढे म्हणाला, “प्रतापजींच्या व्हिजनमधून जी नर्व क्रांती घडतेय, नव्या, इलेक्ट्रिक बसेस सुद्धा जोडल्या जाणार आहेत. पुढे जाऊन सगळ्या एसटी बस इलेक्ट्रिक करण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलाय. ड्रिंक अँड ड्राईव्ह ही फार मोठी गोष्ट आहे. आपण फार कॅज्युअली घेतो. किती अपघात आपल्या अवतीभोवती घडतात. त्याचं मुख्य कारण ड्रिंकिंग आणि ड्रायव्हिंगमूळं आहे. नियमांचे पालन आपण व्यवस्थित करत नाही. “
दरम्यान, मराठी सक्तीच्या निर्णयामुळे रिक्षा व टॅक्सी चालक संघटनांनी संपाचा इशारा दिल्याने प्रवाशांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकार आणि संबंधित संघटनांमध्ये तोडगा काढण्यासाठी चर्चेची गरज अधोरेखित होत आहे.
