उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्याचा आणखी एकच दिवस बाकी
मुंबई/ठाणे, दि. २८: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज विविध उमेदवार आपापले अर्ज दाखल करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात भव्य रॅली काढली आणि कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि उतर यावेळी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती मतदारसंघातून आज नामनिर्देशनपत्र दाखल केलं. बारामतीतून महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघातून, तर विश्वजीत कदम यांनी पलूस कडेगावमधून अर्ज भरला. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले प्रताप चिखलीकर यांनीही आज लोहा कंधार विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. खासदार नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी कुडाळमधून उमेदवारी अर्ज भरला.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माहीमचे उमेदवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनीही आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय इतरही नेते अर्ज दाखल करत आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काल उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यात गेवराईतून विजयसिंह पंडीत, फलटणला सचिन पाटील, निफाडमधून दिलीपकाका बनकर तर पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं येत्या निवडणुकीसाठी नऊ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये मोहोळमध्ये सिद्धी कदम, परळीत राजेसाहेब देशमुख, चिंचवडमध्ये राहुल कलाटे, भोसरीत अजित गव्हाणे, करंजा विधानसभेसाठी ज्ञायक पटणी, हिंगणघाटमध्ये अतुल वांदिले, हिंगणामध्ये रमेश बंग, अणुशक्तीनगरमध्ये फहाद अहमद, माझलगाव येथे मोहन जगताप आदींना उमेदवारी देण्यात आली आहे. फहाद अहमद हे हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे पती आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला उघड विरोध केला आहे.शिवसेना शिंदे गटानेही काल २० उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली. यामध्ये वरळीमधून मिलिंद देवरा, पुरंदरमधून विजय शिवतारे, कुडाळमधून निलेश राणे, कोल्हापूर उत्तरमधून राजेश क्षीरसागर आणि दिंडोशीमधून संजय निरुपम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसतर्फे काल १४ उमेदवारांची पुढची यादी जाहीर करण्यात आली, यात पुणे कॅटॉनमेंटमधून रमेश बागवे, शिवाजीनगरमधून दत्तात्रय बहिरट तर पंढरपूरमधून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अंधेरी पश्चिममधून या आधीच्या यादीत सचिन सावंत यांना उमेदवारी दिली होती. परंतु आता या जागेवर अशोक जाधव यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे.
