प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात केला प्रवेश
नवी मुंबई, दि. २२: वडील एका पक्षात तर मुलगा एका पक्षात असं चित्र महाराष्ट्राने याआधी अनेकदा पाहिलं आहे. असंच काहीसं आज नवी मुंबईमध्ये घडलं. माजी मंत्री गणेश नाईक यांचे पुत्र व भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी आज भाजपला सोडचिठ्ठी देत वाशी येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या या कृतीमुळे भाजपला नेतृत्वाला धक्का बसल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी भाजपने आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणेश नाईक यांचंही नाव होतं. तर लागुनच असलेल्या बेलापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना पक्षातर्फे उमेदवारी देण्यात आली आणि नेमकी इथेच माशी शिंकली. गणेश नाईक यांचे पुत्र व माजी आमदार संदीप नाईक यांना भाजपकडून तिकीट मिळेल अशी आशा होती, ते या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक होते. परंतू, मंदा म्हात्रे यांना तिकीट जाहीर झाल्यामुळे त्यांचे सर्व इमले क्षणार्धात कोसळले.
दरम्यान पुढील दिशा ठरवण्यासाठी संदीप नाईक यांनी आपल्या समर्थकांची बैठक घेतली. यात पडद्याआड अनेक घडामोडी झाल्या व अखेर शरद पवार यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान आ. गणेश नाईक व त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यावेळच्या अखंड राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भारतीय जनात पक्षाचा झेंडा हाती घेतला होता. आज अखेर नाईक यांच्या पुत्राने घरवापसी करत नवी मुंबईतील पुढील राजकारणाची दिशा निच्छित केली. संदीप नाईक यांचा प्रचार करण्यासाठी स्वतः गणेश नाईक उपस्थित राहतात का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
