राजस्थानात शालेय अभ्यासक्रमात वीर सावरकरांवर वादग्रस्त टिप्पणी; देशभर केला जातोय निषेध
जयपूर: विज्ञाननिष्ठ हिंदुत्वाचे समर्थक राहिलेले क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील राजकारण काही केल्या शांत होण्याचं नाव घेत नाहीये. लोकसभा निवडणुकीदरम्यान राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये याच विषयावर शाब्दिक युद्ध भडकले होते. आता त्याचा पुढचा अध्याय राजस्थानात पाहायला मिळत आहे. शालेय शिक्षण अभ्यासक्रमातील इयत्ता १०वी च्या पाठयपुस्तकात “इंग्रजी साम्राज्यचा प्रतिकार आणि संघर्ष” या शीर्षकाखालील धड्यात लिहिलं गेलं आहे की इंग्रजांनी केलेल्या यातनांना कंटाळून वीर सावरकर चार वेळा माफी मागितल्यावर कारावसातून मुक्त झाले होते.
यात म्हटलं गेलं आहे की वीर सावरकर सेल्युलर जेल मध्ये इंग्रजांची माफी मागितल्यानंतर त्यांच्याबरोबर काम करण्यास तयार झाले. राज्यातील पाठ्यपुस्तकातून आरएसएस चे संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्याशी निगडित धडे काढल्यानंतर वीर सावरकरांवर संक्रांत आली आहे. पाठ्यपुस्तकात राजस्थान मधील काँग्रेस च्या गेहलोत सरकारने केलेल्या बदलांमुळे राज्यात तसेच देशभरात राजकारण तापलं आहे.
महाराष्ट्रातल्या सावरकर प्रेमींनीही याचा निषेध केला आहे. बऱ्याच जणांचं म्हणणं असं की वीर सावरकर यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील तसेच सामाजिक सुधारणांमधील योगदान हे अभूतपूर्व आहे. ज्याने आपलं सारं आयुष्य देशसेवेसाठी वेचलं त्याला अशा राजकारणात ओढू नये. तसेच वीर सावरकर हे भाजप आणि काँग्रेस च्या राजकारणापालिकडले आहेत असेही काहींनी मत मांडले.
