कृषिवार्ता: परदेशी कापसाच्या आयातीनंतर दरात मोठी घट
नागपुर, दि. ९: विदेशातून सुमारे १५ लाख कापसाच्या गाठी आयात केल्यामुळे देशात तसंच महाराष्ट्रात सुद्धा कापसाचे भाव पडले आहेत. त्यामुळे याबाबत शासनानं लवकरात लवकर धोरण आखून कापूस उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, आणि आयातीवर बंधनं आणली पाहिजेत. असं धोरण केंद्र सरकारनं आखलं नाही, अशी टीका त्यांनी केली.
महाविकास आघाडीची सभा येत्या १६ तारखेला नागपुरात होत असून त्यासाठी रीतसर सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत, असं देशमुख यांनी सांगितलं. या वज्रमूठ सभेला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
