‘चौकीदार चोर’ प्रकरणी, राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने बजावली नोटीस
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राफेल प्रकरणी घेरण्याच्या प्रयत्नात ‘चौकीदार चोर है’ असे वारंवार म्हणणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. भाजप खासदार मीनाक्षी लेखी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना ही नोटीस बजावली आहे.
येत्या २२ एप्रिलपर्यंत या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण द्या,’ असे आदेश न्यायालयानं राहुल गांधींना दिले आहेत. ‘राफेल’ खरेदी प्रकरणात नवी माहिती समोर आल्यानं त्यावर फेरसुनावणी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ती न्यायालयानं मान्य केली. न्यायालयाच्या या निर्णयावर बोलताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. चौकीदार चोर आहे, हे न्यायालयानंही मान्य केल्याचं त्यांनी म्हटलं होतं. भाजपच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्या वक्तव्याला तीव्र आक्षेप घेत न्यायालयात धाव घेतली होती. ‘राहुल हे स्वत:ची मतं सर्वोच्च न्यायालयाच्या तोंडी घालत आहेत. त्यामुळं न्यायालयाचा अवमान झाला आहे,’ असं लेखी यांनी याचिकेत नमूद केलं होतं.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर आज या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी खंडपीठानं राहुल यांना नोटीस बजावली.
